मुंबईत इंच इंच मोकळी जागा वाढवायचा संकल्प करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून उद्यानाची जागा ताब्यात घेण्यास चालढकल केली जात आहे. मरोळमधील पंचतारांकित हॉटेलने उद्यानाची आरक्षित जागा देऊ केल्यानंतरही ती जागा ताब्यात घेऊन उद्यान विकसित न करता मरोळवासीयांना या सेवा सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे याचा निषेध आणि झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी भाजपच्यावतीने स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे.
सुधार समितीत जानेवारी २०२० मध्ये हरकतीचा मुद्दा
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील उद्यानाकरिता आरक्षित भूखंडावर जे डब्ल्यू मेरियट, वॉटर स्टोन ललित इंटरनॅशनल आदींची उभारणी करताना ह्या हॉटेल्सने नियमानुसार महापालिकेला एकूण भूखंडाच्या १० टक्के जागा उद्यानाकरिता विकसित करून देणे आवश्यक होते. त्यानुसार १० टक्के जागा खुली जागा या प्रवर्गात राखून ठेवणे आवश्यक आहे. परंतु या हॉटेल्सनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने भाजपा नगरसेवक अभिजित सामंत यांनी सुधार समितीमध्ये जानेवारी २०२० मध्ये हरकतीचा मुद्दा उपस्थित करून तसेच तत्कालीन महापालिका आयुक्तांना भेटून निवेदन देत प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणली होती.
उद्यानाच्या जागेचा आद्यप महापालिकेकडे ताबा नाही
त्यानंतर महापालिकेचे अधिकारी जागे झाले. के पूर्व विभागाचे अधिकारी तसेच इमारत प्रस्ताव व मालमत्ता विभागाने त्या जागेची पाहणी केली. या भेटीनंतर जे. डब्लू. मेरियट या हॉटेलने महापालिकेला १० टक्के जागा उद्यानाकरिता देण्याचे मान्य केले. पण या उद्यानाची जागा आद्यपही महापालिकेने ताब्यात घेतली नाही. तसेच वॉटर स्टोन या पंचतारांकित क्लबबाबत महापालिकेने कोणतीही कार्यवाही सुरू केलेली नाही.
स्वाक्षरी अभियान पुढील आठवडाभर
प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे मरोळ येथील नागरिक , विशेष करून लहान मुलं तसेच वरिष्ठ नागरिक उद्यान व या मोकळ्या जागेपासून वंचित आहेत. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही व्हावी व एकूण १ लाख चौरस मीटरचे उद्यान मरोळकरांना उपलब्ध व्हावे म्हणून एक स्वाक्षरी अभियान रविवार १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घेण्यात येत आहे. हे स्वाक्षरी अभियान पुढील आठवडाभर संपूर्ण विभागात चालवून या सर्व स्वाक्षऱ्या महापालिका आयुक्तांना सुपूर्द करण्यात येतील, अशी माहिती भाजपचे महापालिकेचे उप गटनेता व सुधार समिती सदस्य अभिजित सामंत यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community