गेल्या दीड वर्षांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप कोरोनाबाधितांची नोंद राज्यात सुरू आहे. राज्यातील वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये (एमपीए) कोरोनाचं थैमान पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या तब्बल २२ कॅडेट्स म्हणजेच पोलीस प्रशिक्षणार्थींची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
(हेही वाचा- पोलिसांची मोठी कारवाई! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा)
कोरोना चाचणीत २२ जणं पॉझिटिव्ह
मिळालेल्या माहितीनुसार, हे पोलीस प्रशिक्षणार्थीं सात दिवसांकरता सुट्टीवर होते आणि त्यांच्या गावी गेले होते. सात दिवसांची सुट्टी संपल्यानंतर हे पुन्हा परतले. कामावर रूजू होण्यापूर्वी त्या सर्व पोलीस प्रशिक्षणार्थींना तीन ते चार दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. नंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली या चाचणीत २२ जणं कोरोना पॉझिटिव्ह आले.
कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
शनिवारच्या रात्री महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील कोरोनाग्रस्त २२ पोलीस प्रशिक्षणार्थींना नाशिकरोडवरील नाशिक महानगरपालिका संचालित बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्ध्या त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जितेंद्र धनेश्वर यांनी २२ प्रशिक्षणार्थींना बिटको रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी असेही सांगितले, या सर्व प्रशिक्षणार्थींना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रशिक्षणार्थींची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्यास, त्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या ८८७ बॅचमध्ये सामील होण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.