तीन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सापडलेल्या काळ्या बिबट्याला आई सापडली आहे. शनिवारी रात्री बिबट्याची दूरावलेली आई त्याला भेटली. राज्यात गेल्या तीन वर्षांत काळ्या रंगाचे बिबटे दिसू लागले आहेत. वन्यजीवप्रेमींच्या दाव्यानुसार काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीतही काळ्या रंगाचा बिबट्या दिसून आला होता. याआधीही कोकणात काळ्या रंगाचा बिबट्या काही वेळा दिसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अंदाजे वर्षभराचा बिबट्या रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला. विहिरीत पाणी नसल्याने त्याला बचाव करताना फारशा अडचणी आल्या नाहीत. कुडाळमधील गोवेरी गावात गुरुवारी ही घटना घडली. बिबट्याचे काळे पिल्लू पाहताच गावकर्यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली.
बिबट्या व आईचे मिलन
या काळ्या रंगाच्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी साधारणतः वीस मिनिटांचा वेळ गेल्याचे वनअधिकार्यांनी सांगितले आहे. या काळ्या रंगाच्या बिबट्याला विहिरीबाहेर सुखरुप काढल्यानंतर त्याची शारीरिक तपासणी केली गेली. त्याची तब्येत तंदरुस्त असल्याने वनविभागाने आईपासून दूरावलेल्या बिबट्याचे मिलन करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे शनिवारी रात्री बिबट्याला कुलूप नसलेल्या लाकडी पिंजर्यात ठेवले गेले. काळ्या रंगाच्या बिबट्यावर कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून वनविभागाची नजर होती. रात्र गडद होताच बिबट्याची आई आली अन् त्याला घेऊन गेली. शनिवारी रात्री काळ्या रंगाच्या बिबट्याचे आईशी मिलन झाले. यामुळे दोघेही आनंदी झाले असे मत, कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉक्टर क्लेमेट बॅन यांनी व्यक्त केले.
(हेही वाचा : बापरे..! कोब्रा सापाला करावा लागतोय, मांजरींचा सामना)
राज्यात कधी आढळले काळ्या रंगाचे बिबटे ?
– मे २०१८ साली विदर्भातील ताडोबात आलेल्या कुटुंबाच्या कॅमेर्यात पहिल्यांदा फिकट काळ्या रंगाचा बिबट्या दिसला होता.
– २०२० साली मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र सफारीत काळ्या रंगाचा बिबट्या आढळला.
– यंदाच्या वर्षी नवेगाव नागझिरामधील व्याघ्र प्रकल्पातही काळ्या रंगाचा बिबट्या दिसून आला होता.
बिबट्याचा रंग काळा कसा ?
अनुवांशिकतेने बिबट्याचा रंग काळाही दिसून येतो. जन्मतःच बिबट्यांना काळा, पिवळा, करडा कित्येकदा निळा रंगही मिळतो.
Join Our WhatsApp Community