राज्यात ऑक्टोबर हीट सरत असताना रविवारी मुंबईचा पारा ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचला. अजून दोन दिवस मुंबईत कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसवर नोंदवले जाईल, असा अंदाज आहे. मंगळवारपासून तीन दिवस मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे.
ऑक्टोबर हीट सरत असतानाच राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचे राहतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलाय. पावसाच्या प्रभावामुळे येत्या दिवसांत कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असली तरीही उत्तर कोकणात कमाल तापमानाचा दाह सर्वांना सोसावा लागणार आहे.
(हेही वाचा – एचएससी, एसएससी विद्यार्थ्यांना परीक्षा ‘फी’ परत मिळणार!)
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांत पावसाला सुरुवात झाली. मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाची अधूनमधून सर दिसून आली. दक्षिण कोकणात दोन दिवसांपासून पावसाचा जोर दिसून येतोय. रविवारीही कोकणातील बहुतांश भागांत चांगलाच पाऊस झाला. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत तर मध्य महाराष्ट्रातील सातारा येथे पावसाला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यापासून ऑक्टोबर हीट सरायला सुरुवात झाली होती. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान हळूहळू खाली आले होते. दरम्यानच्या काळात मुंबईतही किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. त्यानंतर किमान तापमान पुन्हा चार अंशाने वाढल्याचे दिसून आले. मुंबई पाठोपाठ पुण्यातील किमान तापमानातही वाढ नोंदवली जात होती. सोमवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वा-याचा प्रभाव राहील. गुरुवारपर्यंत या तिन्ही जिल्ह्यांत हीच स्थिती राहील, असेही वेधशाळा अधिका-यांकडून सांगण्यात आले.
१८ नोव्हेबंरपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि नजीकच्या मराठवाडा भागांत पाऊस राहील. काही ठिकाणी हलका पाऊस राहील. येत्या १७ नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल.
Join Our WhatsApp Community