दक्षिण मुंबईतील माझगाव ते नवी मुंबईतील बेलापूर दरम्यान जलमार्ग सेवा लवकरच सुरू होणार आहे. ऑक्टोबरमध्ये याची चाचणी सुरू केल्यानंतर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या (MMB) सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट दक्षिण मुंबईतील माझगाव येथील प्रिन्सेस डॉक आणि नवी मुंबईतील बेलापूर येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (DCT) दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार आहेत. या नव्या सुविधेमुळे या मार्गावरील प्रवास जवळपास निम्म्या वेळेत पूर्ण होणार आहे.
४५ मिनिटांत पूर्ण होणार प्रवास
माझगाव ते बेलापूर हा प्रवास रस्ते मार्गाने करण्यासाठी दोन तासांचा तर, रेल्वे मार्गाने प्रवास केल्यास दीड तासांचा कालावधी लागतो. पण, या जलमार्गाने प्रवास केल्यास अधिकाधिक ४५ मिनिटांचा अवधी लागेल. ही कॅटरामन श्रेणीतील सेवा असेल, ज्यात एकावेळी ६५ ते ७० प्रवासी प्रवास करू शकतील. कॉर्पोरेट्स किंवा मोठ्या कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठी स्पीड बोटीसारख्या लहान आणि वेगवान बोटी असतील. हे लॉन्चर महाग पण वेगवान असतील आणि एकावेळी १० ते १५ लोकांना सामावून घेण्याची क्षमता या लॉन्चरमध्ये असेल.
( हेही वाचा : तिकीट तपासणीतून ‘मध्य रेल्वे’ने केली १००.८२ कोटींच्या महसुलात बचत )
दुप्पट भाडे
या लॉन्चरचे एकेरी भाडे सुमारे ३०० रुपये असण्याची शक्यता आहे. हे तिकीट दर प्रथम श्रेणी प्रवासासाठी १५० रुपये असलेल्या रेल्वे तिकिटापेक्षा खूपच जास्त आहे. प्रवाशांना आरामात प्रवास करता येणार असून, प्रवाशांनी खाजगी वाहने किंवा कॅबने इतके अंतर प्रवास केल्यास त्यांच्या तुलनेत हे दर कमी आहेत. असे, मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बेलापूर ते ठाणे, वाशी ते ठाणे आणि गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरही वॉटर टॅक्सी धावतील. “सध्या, बेलापूर-मुंबई मार्गावर काम पूर्ण झाले आहे आणि आम्ही लवकरच सेवा सुरू करू,” असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community