…तर ‘एसटी’च्या एमडींच्या कार्यालयाला टाळे ठोकू; दरेकरांचा इशारा

120

महाविकास आघाडी सरकारचा समज असेल की, कर्मचा-यांवर दबावशाही करुन त्यांना जबरदस्तीने कामावर रुजू व्हायला लावू व एसटी कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करु. तर सरकार मुर्खाच्या नंदनवनात वावरते आहे. कुठलीही जोर जबरदस्ती एसटी कर्मचा-यांवर करु नका. जर अशा जबरदस्तीने एसटी कर्मचा-यांचे आंदोलन पेटले तर त्याला सरकार जबाबदार असेल. जर सरकारने येत्या दोन-तीन दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर एसटीच्या एमडींच्या कार्यालयाला टाळे ठोकून एसटीचा सर्व कारभार ठप्प करु, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.

झापेचे सोंग घेतलेल्या सरकारने जागे व्हावे

आझाद मैदानात आंदोलनला बसलेल्या एसटी कर्मचा-यांची प्रविण दरेकर यांनी आज भेट दिली. यावेळी आमदार गोपीचंद पडाळकर, सुनिल गणाचार्य आदी उपस्थित होते. याप्रसंगी दरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील सर्व एसटी डेपो कडेकोट बंद आहेत. आता डेपो मँनेजर व अधिका-यांनी आंदोलनाला समर्थन दिले आहे. त्यामुळे आता तरी झापेचे सोंग घेतलेल्या सरकारने जागे व्हावे व या कर्मचा-यांना न्याय द्यावा, अशी आम्ही सरकारला नम्र विनंती करतो असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

मग ‘त्या’ घोषणेचे काय झाले?

संजय राऊत व अजितदादा पवार यांची विधाने आश्चर्यकारक असल्याचे नमूद करताना दरेकर यांनी सांगितले की, एसटी कर्मचा-यांना आधार द्यायचे सोडून जे कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत त्यांना हेच नेते सांगत आहेत की, आंदोलन मागे घ्या. पण यामधून समन्वय काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होत नाही. शरद पवार साहेब यांनी एसटीच्या अधिवेशनात एसटी विलिनीकरण करण्याची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले होते. १५ दिवसात यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले होते. अजित दादा यांची मी जबाबदारी घेतो. मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांची जबाबदारी घ्यावी अशी घोषणाही केली. मग त्या घोषणेचे काय झाले, असा सवालही दरेकर यांनी केला.

(हेही वाचा – ‘कोरोना’त पालिकेच्या विकास कामांना गती; ६ महिन्यात ८० ते ९० टक्के निधी खर्च)

तर एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्या

सरकार रोज अफवा पसरविण्याचे काम करीत आहे. एसटीचे दरदिवशी १५० कोटी नुकसान होत असल्याचे सांगत आहे. एसटीचे कर्मचारी कामावर येण्यास सुरुवात झाली अशी अफवा पसरवित आहे. असे स्पष्ट करताच दरेकर म्हणाले की, मग सरकार एसटीचे नुकसान वाढवित जाणार आहे का. सरकारचा अहंकार व प्रतिष्ठा एसटीच्या नुकसानीपेक्षा मोठी आहे का?जर सरकारचे नुकसान होत असेल तर एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय लवकर जाहीर करा. तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकाने या विषयाच्या संदर्भात काय केले याचा अभ्यास करा व निर्णय घ्यावा असे आवाहन दरेकर यांनी केले.

जनतेला पाठिंबा देण्याची विनंती

राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या न्याय मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. गावा गावातून मुंबईत आलेले सर्व कर्मचारी दिवस रात्र या आंदोलनात सहभागी झाले आहे. त्या कर्मचा-यांना जी मदत लागेल ती मदत मुंबईकरांनीही त्यांना उत्स्फूर्तपणे द्यावी. त्यांना आधार द्यावा व एसटी कर्मचा-यांच्या लढ्याला पाठबळ द्या अशी विनंतीही प्रविण दरेकर यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.