भायखळा येथील मोहम्मद सुफी रेहमान क्रीडांगण अर्थात झुला मैदानाच्या सुशाभिकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले होते. या उद्यानात भूमिगत वाहनतळ उभारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. परंतु प्रत्यक्षात भूमिगत वाहनतळाचा प्रस्ताव अखेर प्रशासनाने गुंडाळून ठेवल्यानंतर अखेर या उद्यानाच्या सुशोभिकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भायखळावासियांना झुला मैदानात खऱ्या अर्थाने झुलायला मिळणार आहे.
भायखळा येथील मोहम्मद सुफी अब्दुल सुफी क्रीडांगणात (झुला मैदान) भुयारी वाहनतळ बनवण्याची मागणी स्थानिक नगरसेवक व समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली होती. त्यामुळे प्रशासनाने या भूमिगत वाहनतळाची शक्यता तपासण्यासाठी तसेच याचा आराखडा बनवण्यासाठी सल्लागाराचीही नेमणूक केली होती. परंतु सल्लागार नेमल्यानंतरही झुला मैदानात भुयारी वाहनतळ उभारण्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट प्रशासनाने आता तर भुयारी वाहनतळाचा प्रस्तावच गुंडाळून ठेवल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – ‘कोरोना’त पालिकेच्या विकास कामांना गती; ६ महिन्यात ८० ते ९० टक्के निधी खर्च)
महापालिकेच्यावतीने या उद्यानात भुयारी वाहनतळ बनवण्यात येत नसल्याने अखेर या उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करण्याचा निर्णय समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांच्या सुचनेनुसार हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागवण्यात आली आहे. यासाठी १ कोटी १ लाख रुपये करण्यात येत आहे. यासाठी जे.जे. डेव्हलपर्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
या उद्यानाच्या नुतनीकरणामध्ये संरक्षक भिंतीची दुरुस्ती करून नवीन सजावटीच्या जाळ्या लावणे, मुलांसाठी खेळांच्या जागेची निर्मिती करणे, मैदानात मातीची भरणी करणे, नवीन बास्केटबॉल कोर्ट बांधणे, नवीन सुशोभित प्रवेशद्वार बांधणे, याशिवाय संरक्षण भितीला बसाल्ट दगडाचे आवरण लावणे आदी कामांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community