गडचिरोली भागात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० पथकाने केलेल्या धडक कारवाईत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामध्ये नक्षलवाद्यांचा जहाल नेता मिलिंद तेलतुंबडे हाही ठार झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांना वेगळीच चिंता भेडसावू लागली आहे. या चिंतेने या भागात नक्षलवाद्यांना चळवळ कशी चालवायची, असा प्रश्न पडला आहे.
नक्षलवादी चळवळीचे नुकसान
मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. त्याच्याकडे बरेच अधिकार होते. तसेच पैशाचे व्यवहारही त्याच्याकडेच होते. त्याने चळवळीचा कोट्यवधी पैसा हा जमिनीच्या खाली गाडून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्याच्या मृत्यूबरोबर हे गूढ त्याच्याबरोबरच निघून गेले आहे. त्यामुळे चळवळ चालवण्यासाठी हा पैसा गरजेचा असून तो कुठे लपवला आहे, याचा शोध घेण्यासाठी आता नक्षलवाद्यांची धावपळ सुरु झाली आहे. हा पैसा तेलतुंबडेने जमिनीत गाडून ठेवल्याची नक्षलवाद्यांना पक्की माहिती आहे, मात्र घनदाट अरण्यात ते ठिकाण नक्की कुठे आहे, हे मात्र नक्षलवाद्यांना माहित नसल्याने त्यांची गोची झाली आहे. हा पैसे किती आहे, याचाही अंदाज नाही. सध्या नक्षलवादी चळवळ चालवण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. असे असताना मात्र हा पैसा जर सापडला नाही, तर नक्षलवादी चळवळीचे मोठे नुकसान होणार आहे.
(हेही वाचा क्रूझ ड्रग्ज पार्टीचे मास्टरमाईंड गोसावी, पाटीलच! सॅम डिसूझाची जबानी)
कोण आहे तेलतुंबडे?
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी २६ नक्षलवादी ठार झाले. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याने नक्षलींना मोठा झटका बसला. मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो भूमिगत होता. तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. ३२ वर्षांपूर्वी त्याने चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. ‘वेकोलि’ कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. मिलिंद तेलतुंबडे नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती. कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. १ मे २०१९ रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. मिलिंद तेलतुंबडेवर ५० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community