परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करत आहेत. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कॉरिडॉर बंद करण्यात आला होता. मात्र १८ नोव्हेंबरपासून भारत-पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कर्तारपूर पुन्हा उघडल्याने गुरुपूरबचे औचित्य साधून पहिले शीख गुरू, गुरु नानक यांच्या जयंतीपूर्वी हजारो भाविकांना, मुख्यत्वे शीख बांधवांना पाकिस्तानमधील गुरु नानकांच्या अंतिम विश्रांतीस्थानाला भेट देण्यासाठी मदत होईल. या संदर्भात पंजाबमधील भाजप खासदार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
व्हिसामुक्त प्रदेश
कर्तारपूर हा ४.७ किलोमीटरचा कॉरिडॉर व्हिसामुक्त असून भारतीय सीमेला पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबशी जोडतो. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या कॉरिडॉरचे उद्घाटन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. भारतीय भाविकांना पाकिस्थानमधील या विश्रामस्थळी जाण्यास कर्तारपूर कॉरिडॉर हा एकमेव व्हिसामुक्त मार्ग आहे. अन्य मार्गाचा वापर केल्यास यात्रेकरू अटारी-वाघा सीमेवरून गुरुद्वाराला भेट देऊ शकतात, ज्यासाठी व्हिसा आवश्यक आहे. त्यामुळे कर्तारपूर पुन्हा खुला झाल्यास भाविकांना सोयीचे ठरणार आहे.
( हेही वाचा : आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार! नारायण राणेंचा हल्लाबोल )
कर्तारपूर कॉरिडॉर
पंजाबमधील गुरुदासपूर येथील बाबा नानक मंदिरापासून, पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत हा कॉरिडॉर जोडला गेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले होते. कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारतातील शिख बांधवांना पवित्र स्थळ असलेल्या कर्तारपूरला जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने हा मार्ग बंद कण्यात आला.