मुंबईची होतेय दिल्ली? काळजी घ्या, मुंबईची हवा दिल्लीपेक्षा ‘विषारी’

156

सध्या राजधानी दिल्लीसह इतर राज्यातील प्रदूषणाचा मुद्दा सर्वत्र चर्चेचा असताना आता मुंबईची हवा देखील विषारी असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे दिल्लीतील प्रदूषण वाढल्याने धोक्याची पातळी ओलांडल्याचे वृत्त सर्वच प्रसार माध्यामतून समोर येतेय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली असतानाच धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील कुलाबा परिसरातील हवा त्यापेक्षाही विषारी असल्याचे समोर आले आहे. तर दिल्लीतील लोकांचा वायू प्रदूषणाने श्वास रोखून धरल्यानंतर मुंबईतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे.

(हेही वाचा – मुंबईत फिरताय? सावधान! सायको किलर्सचा वाढतोय धोका)

मुंबईकरांनो सतर्क व्हा…

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सफर’ या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणालीने याबाबत अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सोमवारी दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३३१ नोंदवण्यात आला. तर कुलाबा परिसरातील निर्देशांक तब्बल ३४५ एवढा नोंदवण्यात आला आहे. जो दिल्लीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे मुंबईची दिल्ली होऊ नये म्हणून मुंबईकरांनी सतर्क होऊन काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.

असा आहे हवा गुणवत्ता निर्देशांक

मुंबईतील कुलाबा, मलबार परिसरावर धुक्यांची चादर पसरलेली होती. काल मुंबईतील कुलाबा, माझगाव, बीकेसी, मालाड आणि अंधेरी परिसरातील हवेची स्थिती खालावली होती. यासह हिवाळ्यात प्रामुख्याने वाऱ्यांची दिशा जमीनीकडून समुद्राकडे असल्याने हे प्रदूषण वाढल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर कोरोनानंतर रस्त्यावर वाढलेली वर्दळ, सुरू झालेले कारखाने आणि दिवाळीत मुंबईकरांनी फटाक्यांची आतषबाजी केल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, सोमवारी संपूर्ण मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक २४५ नोंदवला गेला आहे. हा निर्देशांक आरोग्यासाठी वाईट असतो, तर काही भागात हवेची गुणवत्ता अगदी खालच्या पातळीवर पोहोचली असल्याचे समोर आले आहे.

शहर                       एक्यूआय 

  • भांडुप                   १११
  • कुलाबा                  ३४५
  • मालाड                  ३०६
  • माझगाव                ३२५
  • वरळी                   ११५
  • बोरिवली                १४९
  • बीकेसी                  ३१४
  • चेंबूर                     १४९
  • अंधेरी                    २५९
  • नवी मुंबई                १३०

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.