शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा मुंबई महापालिका सभागृहात बसवण्याची मागणी होत आहे. परंतु सभागृहात पुतळे उभारण्यासच जागा नसल्याने आता या पुतळ्यांना इतर समिती सभागृहांमध्ये जागा दिली जावी, असा प्रस्तावच आता प्रशासनाचा आहे. यावर गटनेत्यांच्या सभेत निर्णय घेतला जावा, अशी विनंती प्रशासनाकडून केली जात आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा पुतळा स्थायी समिती सभागृहात बसवण्याचा निर्णय घेतला गेल्यास आता त्या समितीचे कामकाज त्यांच्या साक्षीने केले जाण्याची शक्यता आहे.
जागाच नसल्याने हे पुतळे बसावयचे कुठे?
शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात बसवण्याची मागणी केली होती. परंतु महापालिका सभागृहात पुतळेच उदंड झाले असून नवीन पुतळे बसवण्याची मागणी होत असली तरी प्रत्यक्षात तिथे जागाच नसल्याने हे पुतळे बसावयचे कुठे हा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. त्यातच आता नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाच नामनिर्देशित नगरसेवकांसह ही संख्या ४१ वर पोहोचणार आहे. या वाढलेल्या सदस्यांना तसेच महापालिका चिटणीस खात्याचे कर्मचारी, प्रशासकीय समितीचे कर्मचारी, पत्रकार तसेच संबंधित विषयांसदर्भातील अधिकारी यांनाही बसण्यासाठी जागा अपुरी पडणार असल्याने सदस्यांच्या मागणीनुसार अधिक पुतळे बसवण्याची मागणी पूर्ण करता प्रशासनाची मोठी अडचण होत आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्रात ‘काय ते द्या’चं राज्य”; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा)
पुतळ्यांसह तैलचित्र लावण्याची होतेय मागणी
महापालिकेत सद्यस्थितीत १३ पुतळे आहेत. परंतु सन २००० मध्ये सभागृहाला लागलेल्या आगीमध्ये ११ पैंकी ९ तैलचित्रे ही नष्ट झाली आहे. ही नष्ट झालेली तैलचित्रे आता पुननिर्मित करण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वि.वा. शिरवाडकर, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तर सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, मुंबईचे पहिले नगरपाल रघुनाथ खोटे आदींची तैलचित्र लावण्याची मागणी होत आहे.
… तर बाळासाहेबांचा पुतळा स्थायी समितीच्या सभागृहात
सध्या सभागृहाच्या उपलब्ध क्षेत्रफळाच्या जागेमध्ये सध्या २४७ जणांच्या बैठकीची व्यवस्था आहे. त्यामुळे सभागृहात नवीन अर्धपुतळे तसेच तैलचित्रे लावण्यास जागा उपलब्ध नाही. त्यामुळे महापुरुषांची नवीन तैलचित्रे तथा पुतळे महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृह व इतर समिती सभागृहात लावणे उचित ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता हा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेवरच सोपवला आहे. महापालिका सभागृहात अथवा गटनेत्यांच्या सभेत यावर निर्णय घेतल्यास या सर्व प्रतिक्षेत असलेल्या पुतळ्यांसह तैलचित्रांचा मार्ग मोकळा होणार आहे. सभागृहातील अपुरी जागा लक्षात घेता स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सभागृहांमध्ये हे पुतळे बसवण्याचा निर्णय घेतल्यास बाळासाहेबांचा पुतळा हा स्थायी समितीच्या सभागृहात बसू शकतो, अशी शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community