मृतवन्यजीवांच्या अवयवांची अवैधरित्या तस्करी, केंद्र आणि राज्य वनविभागाची संयुक्त कारवाई

162

जळगावात वन्यजीवांच्या अवयवांची तस्करीची टीप मिळाल्याने केंद्राच्या वन्यजीव गुन्हा नियंत्रण शाखा (डब्ल्यूसीसीबी) आणि राज्य वनविभागाने मिळून दोन आरोपींकडून जिवंत पोपट आणि समुद्रातील प्रवाळ, घोरपडीचे लिंग आणि सायाळ या प्राण्याच्या अंगावरील काट्यांची होणारी अवैध विक्री थांबवली. यापैकी पोपट विकणा-या आरोपीला दंड ठोठावून सोडण्यात आलं. तर समुद्रातील प्रवाळ, घोरपडीचे लिंग आणि सायाळ प्राण्याच्या अंगावरील काटे विकणा-या महिलेला सात वर्षांचा तुरुंगवास आणि अंदाजे 30 हजारापर्यंत दंड न्यायालयाकडून दिला जाण्याची शक्यता आहे.

वनपरिक्षेत्र अधिका-यांनी दिली माहिती

जळगावात स्थानिकांकडून पोपट आणि मृत प्राण्यांच्या अवयवांची बाजारात विक्री होत असल्याची, माहिती वन्यजीव गुन्हा नियंत्रण शाखेला मिळाली होती. याबाबतची माहिती डब्ल्यूसीसीबीनं जळगावाच्या वनविभागाला दिली. एकाच दिवशी या दोन्ही कारवाया करत दोन आरोपींना पकडण्यात आलं. भवानी चौकातील राजकमल टॉकीजजवळ एका मुलाकडून बारा पोपटांची वनअधिका-यांनी सुटका केली. नजीकच्या सुभाष चौकात रस्त्यावरच राहणा-या एका महिलेकडून तब्बल चाळीस प्रवाळ, घोरपड या सरपटणा-या प्राण्याचं लिंग, सायाळ या प्राण्याच्या अंगावरचे काटे वनअधिका-यांनी हस्तगत केलं.२२ वर्षाच्या मुलाकडून आम्ही १२ पोपटांची सुटका केली. त्याच्याकडून दहा हजाराचा दंड आकाराला. महिलेला न्यायालयात सादर केले असून, २६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, अमोल पंडित यांनी दिली आहे.

जाणून घ्या प्राण्यांच्या सुरक्षेबाबत

जंगलातील किंवा समुद्रातील प्राण्याची तस्करी आणि अवैध विक्री हे वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार गुन्हा ठरतो. गुन्हेगारांना आर्थिक दंड आणि तुरुंगवासाचीही तरतूद आहे.

  • पोपट- वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार कलम (४) नुसार पोपट पाळल्यास १० ते २५ हजारांचा दंड ठोठावला जातो.
  • प्रवाळ – वन्यजीव संवर्धन कायदा नुसार कलम एकमध्ये प्रवाळांचे संरक्षण केले जाते. प्रवाळ मुख्यत्वे प्रवाळभस्म नावाचं आय़ुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरत असाल तर सात वर्षाचा तुरुंगवास तसंच आर्थिक दंड आकारला जातो.
  • घोरपडीचं लिंग – नर घोरपडाचं लिंग जादूटोण्यासाठी किंवा आय़ुर्वेदिक औषधात वापरलं जातं. घोरपड वन्यजीव संवर्धन कायदा कलम एकनुसार संरक्षित आहे. त्यामुळे सात वर्षापर्यंत दंड आणि आर्थिक दंड भरावा लागतो.
  • सायाळप्राण्याच्या शरीरावरील काटे – शोभेच्या वस्तूच्या वापरासाठी सायाळ प्राण्याच्या शरीरावरील काटे वापरले जातात. सायाळ हा प्राणी वन्यजीव संवर्धन कायदा १९७२, कलम ४ नुसार संरक्षित आहे. त्यासाठी 10 ते 25 हजारांचा दंड आकारला जातो.

(हेही वाचा :उद्धव ठाकरे राज्याचे पार्टटाईम मुख्यमंत्री! सी.टी. रवी यांचा हल्लाबोल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.