रस्त्यावर फुटलेला फटाका छातीवर आदळत थेट यकृतापर्यंत घुसल्याने २० वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. परळच्या केईएम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. मालाड येथे राहणारा हा तरुण रात्री घरी परत येत असताना हा अपघात झाला. फटाक्यातील धातू छातीत घुसून रक्तवाहिन्यांमार्फत यकृतात पोहोचला. सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी त्याला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथे छातीत अडकलेले पाणी ट्यूबच्या माध्यमातून काढण्यात आलं. पुढील उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांनी कुटुंबीयांना सल्ला दिला.
केईएम रुग्णालयातील गॅस्ट्रोलोजी विभागातील डॉक्टरांनी या मुलावर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया केली नसती तर पित्ताशयाला गंभीर इजा झाली असती अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली. ही शस्त्रक्रिया तब्बल दोन तास चालली. रुग्णाला आता डिस्चार्ज दिल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
असा घडला प्रकार
– शस्त्रक्रियेतून ४ सेमी धातूचा तुकडा यकृतातून काढला.
– यकृतानंतर हा तुकडा पित्ताशयाच्या नलिकेपर्यंत पोहोचला होता. हा तुकडा काढला नसता तर पित्ताशयाच्या नलिकेला गंभीर इजा झाली असती.
– लेप्रोस्कॉपीच्या माध्यमातून हा तुकडा काढण्यात आला.
Join Our WhatsApp Community