राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा विनंती अर्ज फेटाळून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसह घऱचे जेवण देण्याची मागणी केल्यानंतर आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारलेल्या न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची बदली करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाकडून दुसऱ्याच दिवशी न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका न्यायालयात बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र अचानक ही बदली झाल्यामुळे कोर्टाच्या वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. न्या. एच. एस. सातभाई हे ‘प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग ॲक्ट’ या विशेष कोर्टाचं कामकाज पाहत होते.
(हेही वाचा – मांजरींमुळे वाचलं नाल्यात वाहून जाणारं तान्हबाळ!)
…म्हणून झाली बदली
१५ नोव्हेंबर रोजी मुंबई न्यायालयाने न्यायाधीश एच एस सातभाई यांची प्रशासकीय कारणांमुळे बदली करण्यात येत असल्याचा आदेश जारी करण्यात आला. या आदेशानंतर एच एस सातभाई यांची यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. सातभाई यांच्या बदलीला उच्च न्यायालयाने देखील १३ नोव्हेंबर रोजी संमती दिली आहे.
बड्या राजकीय नेत्यांच्या प्रकरणांची सुनावणी
न्यायाधीश एच. एस. सातभाई यांच्या समोर राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या प्रकरणांची सुनावणी झाली होती. महाराष्ट्र सदन घोटाळा, हेक्सवर्ल्ड यांसह अन्य काही हायप्रोफाईल प्रकरणांचा यात समावेश होता. मुळचे नाशिकचे असलेले न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील अनेक आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले होते. ज्यामध्ये समीर भुजबळ, पंकज भुजबळ, चमणकर कुटुंबीय आणि अन्य आरोपींचा समावेश होता. यासह सोमवारीही एच.एस. सातभाई यांच्या न्यायालयात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रिमांड, शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा अटकपूर्व जामीन तर एकनाथ खडसे यांचे भोसरी प्रकरणंही सुनावणीसाठी होते.
Join Our WhatsApp Community