गर्मीने हैराण झालेल्या मुंबईकरांना बुधवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या शिडकाव्यांचा आधार मिळाला. मुंबईत बहुतांश ठिकाणी सायंकाळी पाच ते सहादरम्यान पावसाचे शिडकावे दिसून आले. पावसाच्या शिडकाव्यानंतर कमाल तापमानाचा पारा काहीसा खाली उतरला. बुधवारी कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले असते तरीही गुरुवारी पुन्हा तापमाचा दाह मुंबईकरांना सोसावा लागणार आहे. गुरुवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
ढगाळ वातावरणामुळे आलेली मरगळ दूर
बुधवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. बुधवारी मुंबईत हलकासा पाऊस पडणार, असा पूर्वानुमान असला तरीही प्रत्यक्षात सायंकाळी पावसाचे शिडकावे सुरु झाले. संपूर्ण दक्षिण मुंबईत पावसाचे शिडकावे दिसून आले. पश्चिम उपनगरांत वांद्रे, दादर, माहीम, विलेपार्ले, अंधेरी, चकाला, तर उपनगरांत वडाळा, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर,, भांडूप आणि मुलुंड परिसरातंही पावसाचे शिडकावे सुरु होते. तासाभराचा हा खेळ संपल्यानंतर दिवसभरातच्या ढगाळ वातावरणामुळे दिसून आलेली मरगळ दूर झाली, अशी प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली.
(हेही वाचा – सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळाले मोठे पद, वाचा सविस्तर)
मुंबईकरांसाठी पावसाचा अंदाज
१८ नोव्हेंबर
- कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, किमान तापमान २५ अंश सेल्सिअस
- दिवसभर ढगाळ वातावरण राहील, सायंकाळी किंवा रात्री मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता
१९ नोव्हेंबर
- कमाल ३४ अंश सेल्सिअस, किमान तापमान २४ अंश सेल्सिअस
- दिवसभर ढगाळ वातावरण राहील, अधून-मधून मेघगर्जना होईल