मुंबई पोलिसांकडून कोल्हापूरमधील ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त

कोट्यवधी रुपयाचा ड्रग्स जप्त

165

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोल्हापुरात जाऊन मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी कारखान्याच्या केअर टेकरला अटक करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थ आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. हा ड्रग्सचा कारखाना मुंबईतील राजकुमार राजहंस नावाच्या एका वकिलाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमके काय प्रकरण?

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिट ने १३ नोव्हेंबर रोजी साकीनाका, खैरानी रोड येथून एका महिलेला एमडी या अमली पदार्थासह अटक केली होती. चौकशीत तिने हा अमली पदार्थ एका व्यक्तीकडून घेतला असून त्याचा कोल्हापूरला जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या ढोलगरवाडी या ठिकाणी एमडी तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

(हेही वाचा – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित)

कारखाना उद्ध्वस्त करून एकाला अटक

या माहितीच्या आधारे वांद्रे आणि घाटकोपर युनिटने कोल्हापूरातील ढोलगरवाडी येथील एका कारखान्यावर छापा टाकला असता या कारखान्यात पोल्ट्रीफार्म आणि शेळ्या पालनच्या नावाखाली एमडी बनवण्याचा धंदा राजरोसपणे सुरु होता. अमली पदार्थ विरोधी पथकाने हा कारखाना उद्ध्वस्त करून एकाला अटक केली असून मोठ्या प्रमाणात एमडी आणि त्यासाठी लागणार कच्चा माल आणि एमडी तयार करण्यासाठी लागणारी साहित्य असा एकूण २ कोटी ३५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने छाप टाकून उद्ध्वस्त केलेला ड्रग्स कारखाना ज्या फार्म हाऊसवर होता, तो फार्म हाउस मुंबईतील वकील राजकुमार राजहंस यांच्या नावावर असून त्यांचा या प्रकरणात शोध घेण्यात येत असल्याची माहिती अमली पदरात विरोधी पथकाने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.