महिन्याभरापूर्वी केलेल्या पदपथाच्या कामावर पाणी!

198

अवघ्या महिन्याभरापूर्वी केलेल्या माटुंगा पश्चिम येथील टि.एच.कटारिया मार्गवरील पदपथांचे सिमेंट क्रॉक्रिटीकरण करून सुधारणा करण्यात आली होती. परंतु या सुधारणा केलेल्या पदपथांच्या कामांवर महापालिकेनेच पाणी फेरले आहे. या विभागात होणाऱ्या दुषित पाण्याचा शोध घेण्यासाठी एक महिन्यांपूर्वी बनवण्यात आलेली पदपथच दोन ठिकाणी खोदण्यात आला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात पदपथ खोदल्यानंतर दोन महिने या पदपथाची सुधारणा करण्यात आली नव्हती. दोन महिने पदपथ खोदूनच ठेवला होता, पण त्यावेळी दुषित पाण्याचा शोध न घेणाऱ्या जलअभियंता विभागाला या पदपथांची सुधारणा झाल्यानंतर जाग आली.

मुंबई महापालिकेच्या सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या प्रभागातील माटुंगा पश्चिम येथील टि.एच. कटारिया मार्गवर ऐन पावसाळ्यात गणेशोत्सवाच्या काळात पदपथ खोदून ठेवण्यात आले होते. टाटाची केबल्स टाकण्यासाठी खोदलेल्या या पदपथांची सुधारणा पुढील दोन महिन्यांमध्ये झाली नव्हती. परंतु हिंदुस्थान पोस्टने चालवलेल्या पदपथांबाबतच्या मालिकेतून या पदपथांच्या दुरवस्थेबाबत आवाज फोडल्यानंतर याची दखल घेत लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने तातडीने या पदपथाची सुधारणा करण्याचे काम हाती घेत पूर्ण केले. परंतु या पदपथाचे काम योग्यप्रकारे झाले नव्हते. पदपथांचे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून पदपथाचे काम पुन्हा योग्यप्रकारे बनवून घेतले जाईल, असे आश्वासन सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी दिले होते.

(हेही वाचा – समीर वानखेडे मुस्लिमच! नोकरी सोडावी लागेल! नवाब मलिकांचा दावा)

…तर चांगला पदपथ पुन्हा खोदावा लागला नसता

परंतु या पदपथाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामांकडे त्यांनी लक्षच दिले नाही. त्यातच माटुंगा पश्चिम विभागातील या परिसरात दुषित पाण्याची समस्या असल्याने याचा शोध घेण्यासाठी नव्याने बनवलेले पदपथ बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रवेशद्वारासमोर आणि दुसरे समाधान हॉटेल आणि काशी विश्वेश्वर मंदिरादरम्यान खोदण्यात आले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पिण्याच्या पाण्यामध्ये मलवाहिनीचे पाणी मिसळत असल्याने या दुषित पाण्याचा शोध घेण्यात येत आहे. परंतु यासाठी नव्याने बनवलेल्या पदपथ खोदण्यात आल्यानेही स्थानिकांमध्ये प्रचंड चिड आहे. दोन महिने हा पदपथ खोदून ठेवला होता. तेव्हा जर अशाप्रकारे दुषित पाण्याचा शोध घेतला असता तर चांगला  पदपथ पुन्हा खोदावा लागला नसता.

एकाच प्रभागात पदपथांच्या कामांचा दर्जा वेगळा

सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या प्रभागातील टि.एच. कटारिया मार्गावरील पदपथाचे काम शास्त्रोक्तपणे न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. तिथे जी-उत्तरमधील प्रभाग क्रमांक १९२ प्रभागातील रानडे मार्गावर अत्यंत शास्त्रोक्तपणे पदपथांची सुधारणा करण्यात आली आहे. रानडे मार्गावरील वामन हरि पेठे दुकानापासून ते स्वामी समर्थ मेडिकल दुकानापर्यंतच्या पदपथाची सुधारणा करण्यात आली. येथील पदपथाचा भाग खोदून समतल करण्यात आल्यानंतर १५ दिवसांनी सुधारणा करण्यात आली. यामध्ये सिमेंट क्राँक्रिटीकरणाचे स्टॅम्पिंग करण्यात आले. यावर पिवळा रंग टाकण्यात आला. परंतु त्यानंतर चार दिवस त्यावरील गोणपाटाचे आवरण कायम होते. यावर कायम पाणी सोडून पदपथाचे काँक्रिट मजबूत बनवण्यात आले आहे. ज्यामुळे येथील पदपथ चालण्यास योग्य आणि दिसण्यास आकर्षक बनले आहे. परंतु अशाप्रकारचे काम सभागृहनेत्यांच्या विभागात करण्यात आले नाही. त्यामुळे अवघ्या दुसऱ्या दिवशी येथील पदपथावरील स्टॅम्प पुसले गेले होते. फेरीवाले सामान हटवत नसल्याने पदपथाची कामे योग्यप्रकारे करता येत नसल्याची तक्रारी सभागृहनेत्यांनी मांडली. परंतु शेजारील शिवसेनेच्या नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी फेरीवाल्यांनी व्यापलेले पदपथ चांगल्याप्रकारे बनवून दिले आहे. त्यामुळे एका प्रशासकीय विभागात पदपथ बनवण्याच्या दोन पध्दती कशा, असा प्रश्न पडला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.