भरधाव गाडीनं कासवाला चिरडलं,शस्त्रक्रियेनंतरही प्रकृती गंभीर

137

भरधाव गाडीच्या वेगाने परळ येथे रस्त्यावर आलेल्या फ्लेपशॅल प्रजातीच्या कासवाच्या कण्याचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या कासवाची खार येथील डॉक्टर रिना देव यांच्या दवाखान्यात शस्त्रक्रिया करावी लागली. परंतु त्याच्या जगण्याची शक्यता फारच कमी असल्याची भीती व्यक्त होत आहे. फ्लेपशॅल प्रजातीच्या कासवाला इजा पोहोचवण्याचा विचार असेल तर वनविभाग तुम्हांला थेट तुरुंगातही पोहोचवू शकते, त्यामुळे या कासवाला हानी पोहोचवू नका, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

१६ नोव्हेंबर रोजी परळला रक्तबंबाळ अवस्थेत कासव आढळल्याची तक्रार रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर  या प्राणीप्रेमी संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांकावर आली होती. संस्थेच्या प्राणीप्रेमींनी घटनास्थळी धाव घेताच फ्लॅपशॅल प्रजातीचं कासव रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आलं. अपघातात कासवाचा पाठीचा कणा मध्यभागातून तुटल्यानं फुफ्फुसही बाहेर आलं होतं.नजीकच्या बैलघोडा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर प्राणीप्रेमींनी तातडीने त्याला  खार येथील डॉक्टर रिना देव यांच्या रुग्णालयात हलवलं. कासवाच्या शरीरावरील जखमा पाहता त्यावर पशुवैद्यकीयांच्या टीमने तातडीने शस्त्रक्रिया केली.

कशी झाली फ्लॅपशेल प्रजातीच्या कासवावर शस्त्रक्रिया

पाठीच्या कण्याला शिवण्यासाठी ऑर्थोपॅडीक वायरीचा वापर केला गेला. त्यातून पाठीचा कणा पुन्हा बसवला गेला. त्यावर पांढरी पट्टी लावण्यात आली आहे. सुमारे दीड तास ही शस्त्रक्रिया सुरु होती.फ्लॅपशेल प्रजातीचं कासव सध्या दवाखान्यातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतं आहे.

कुठे आढळतं फ्लॅपशेल प्रजातीचं कासव

दक्षिण आशियात प्रामुख्याने ही प्रजाती आढळते. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार ते अगदी अंदमान-निकोबारमध्ये फ्लॅपशेल प्रजातीचं कासवं आढळून येतं.भारतात गंगेच्या खो-यात हे कासव सहज दिसतं.महाराष्ट्रातही नद्या आणि तलावांतील गोड्या पाण्यामध्ये फ्लॅपशेल प्रजातीच्या कासवाचं दर्शन होतं.

पावसाळ्यात सरपटणारे प्राणी, नदी तसेच तलावातील जलचर पाण्याच्या जोरदार प्रवाहात मूळ अधिवासाबाहेर फेकले जातात. कित्येकदा जलचर थेट समुद्रात जातात. मात्र खा-या पाण्यात त्यांचं राहणीमान नसल्यानं आपल्या मूळ अधिवासात ते परतायला सुरुवात करतात. या दरम्यान, शहरी जीवनाशी संपर्क येताना कित्येकदा सरपटणा-या प्राण्यांचा किंवा जलचरांचा अपघात होतो. मुंबईत तुम्हांला भरटकलेले जलचर किंवा सरपटणारे प्राणी आढळले की संस्थेच्या हेल्पाइन क्रमांकावर त्वरित संपर्क साधा.

तर होऊ शकते तुरुंगात रवानगी

पावसाळ्यात तसेच नंतरच्या काही काळात रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेला दरवर्षाला भरकटलेल्या कासवांच्या किमान ३० तक्रारी येतात. यंदा ‘रॉ’कडून २५ कासवांचा बचाव झाला आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत फ्लॅपशेल प्रजातीला पहिल्या वर्गवारीत संरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे वनविभाग संबंधित गुन्हेगारांना आर्थिक दंड तसेच सात वर्षापर्यंत तुरुंगात रवानगी करु शकतं.

 (हेही वाचा :भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.