मुंबईत ९ वर्षांखालील १३ हजार ९४८ मुलांना कोविडची बाधा झाली आहे. १८ वर्षावरील नागरिकांना कोरोनाचे लसीकरण बंधनकारक केले असतानाच, लहान मुलांसाठी कोणतीही लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक दिसून येत होते. परंतु आता लहान मुलांसाठी लसीकरण चाचण्या सुरू झालेल्या आहेत. पण, या चाचण्यांना पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पालकांचा प्रतिसाद नाही
मुंबईत जवळपास १४ हजार लहान मुलांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर, मुंबईत मुलांच्या लसीकरण चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र यासाठी मुलांचे पालक फारसा पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात २ ते ११ वयोगटातील मुलांसाठी लस चाचणी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत केवळ १० मुलांची नोंदणी करण्यात आली आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. सध्या रुग्णालयात लस चाचणीविषयी चौकशी करण्यासाठी पालकांचा प्रतिसाद दिसून येतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन, शिक्षण मंडळाचे वेळापत्रक तयार! )
सेरो सर्वेक्षणाचा अहवाल
जून महिन्यात मुंबई महानगरपालिकेने सेरो सर्व्हे केला होता. त्यावेळी या सर्वेक्षणानुसार, २ हजारांहून अधिक लहान मुलांची प्रतिपिंडे तपासण्यात आली होती. या सेरो सर्वेक्षणात ५१.१८ टक्के मुले कोरोनाच्या संपर्कात आल्याचे आढळले होते.
Join Our WhatsApp Community