पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान योग्य निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान महोदयांचे आभार मानले आहेत.
लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय
तसेच, शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्रसरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी शिवाय लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा – देशातील ‘ते’ तिन्ही कृषी कायदे रद्द करणार! पंतप्रधानांची मोठी घोषणा)
पंतप्रधानांनी देशवासियांची मागितली क्षमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.
हे होते तीन कृषी कायदे
- शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
- शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020
- अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020