कारवाईचा बडगा! २३८ रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय

122

गेल्या २ आठवड्यांपासून लालपरीची चाकं थांबली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन विविध मागण्यांसाठी कायम सुरूच आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे बस वाहतूक ठप्प असून, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारणं सुरूच आहे. एसटी कर्मचारी आपला संप मागे घेत नसल्याने महामंडळाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी एसटी महामंडळाने २३८ रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर महामंडळाने या बेमुदत संपात सहभागी झालेल्या २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांनी संख्या २ हजार ७७६ इतकी झाली आहे.

एसटी संपाला राजकीय वळण!

मुख्यमंत्र्यांसह न्यायालयाकडून देखील एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करुनही अद्याप बरेच एसटी कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवास करण्यात अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या संपात उडी घेत संपकरी कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे या संपाला आता राजकीय वळण आले आहे. अशा परिस्थितीतच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचे म्हटले आहे. मात्र दोन्ही बाजूंनी चर्चा करुन तोडगा निघत नसल्याने आंदोलन मिटण्याचेही कोणतेही संकेत नाही.

(हेही वाचा – आता एसटीच्या ‘या’ आगारातील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल)

अशा आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • राज्य परिवहन महामंडळाचे प्रशासकीय सेवेत विलिनीकरण करावे.
  • एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये करून, त्यांना क वर्गाचा दर्जा देण्यात यावा.
  • महागाई भत्ता, घरभाडे आणि वेतनात वाढ करावी, अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

जोपर्यंत एसटी कार्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात येणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.