अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाची तीव्रता आग्नेय भागाजवळ कायम आहे. या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. मात्र वारा खवळल्याने उद्या, रविवारपर्यंत अरबी समुद्रातील आग्नेय भागाजवळ मच्छिमारीसाठी जाऊ नका, असा इशारा मच्छिमारांना मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत रविवारपर्यंत हलक्या सरी सायंकाळी भेटीला येतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
समुद्रात जाणे धोक्याचे
समुद्रात वा-यांचा वेग हा ४०ते ५० किलोमीटर ताशीवेगावरुन ६० किलोमीटर ताशी वेगाने वाढला आहे. त्यामुळे समुद्रात जाणे धोक्याचे ठरेल, असा इशाराही हवामान खात्यानं दिलाय. सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस राहील. आज, शनिवारीही सायंकाळनंतर विजांच्या कडकडाटासह दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, तसेच विदर्भात, वर्धा, नागपूरामध्ये पावसाची शक्यता आहे.
( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांना पुन्हा मिळणार गरमा-गरम जेवणाची मेजवानी! )
हवामान विभागाची माहिती
सोमवारनंतर किमान तापमान खाली उतरणार आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा किनारपट्टीपासून दूर जात आहे, त्याची क्षीणताही रविवारनंतर कमी होईल. त्यामुळे सोमवारनंतर किमान तापमानात हळूहळू घट होण्यास सुरुवात होईल. सध्या राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान १२ ते २० अंश सेल्सिअवर नोंदवले जात आहे. तर कोकणात सध्या २५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवल्या जाणा-या किमान तापमानाचा पारा अजून काही दिवसांनी खाली येणार आहे. सोमवारपर्यंत कोकणांत विजांच्या कडकडाटांसह पावसाची हजेरी राहील, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community