राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनलने तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांची निवड केली आहे. त्यामध्ये सध्याचे प्रभारी महासंचालक संजय पांडे यांचे नाव नसल्याने त्यांना महासंचालक पदापासून डच्चू दिला जाईल, अशी शक्यता आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले.
‘या’ अधिकाऱ्यांची शिफारस
लोकसेवा आयोगाने ज्या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची निवड केली आहे, त्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख रजनीश शेठ, महासंचालक (होमगार्ड) के. व्यंकटेशम आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावाचा समावेश आहे. आयोगाने शिफारस केलेल्या नावांपैकी एकाची निवड करण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. या नावांमध्ये संजय पांडे यांच्या नावाचा समावेश नसल्याने पांडे यांना डच्चू मिळाला आहे, असेच सध्या दिसत आहे.
(हेही वाचा दोन वर्षांनंतर सिद्धिविनायकाचे भाविकांना झाले दर्शन!)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून शिफारस
सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये प्रकाश सिंग प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार राज्याचे पोलिस महासंचालक पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची समिती तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस करू शकते. त्यातील एकाची राज्य सरकार निवड करू शकते. या पदावरील निवड संबंधित सरकार त्यांना अनुकूल अशाच अधिकाऱ्याची करत असते. त्यामुळे या तीन नावांपैकी सरकार कुणाची निवड करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. १ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या आयोगाच्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ९ नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आले आहे.
संजय पांडे यांचे काय होणार?
दरम्यान संजय पांडे हे सध्या पोलिस महासंचालक पदावर प्रभारी म्हणून आहेत. लोकसेवा आयोगाने सुचवलेली नावे नाकारून संजय पांडे यांनाच पुढे कायम करायचे का, यावर निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेऊ शकतात. त्यामुळे पांडे यांचे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती असणार आहे.
Join Our WhatsApp Community