मंत्री परबांच्या निवासस्थानी का वाढवला पोलिस बंदोबस्त? वाचा… 

191

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने आता कामगार संतप्त झाले आहेत. आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेले कर्मचारी मंगळवारी, २३ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी घोषणा केली होती. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाभोवती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सोमवारी, २२ नोव्हेंबर रोजी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात एसटी कर्मचाऱ्यांवर ४ तास बैठक झाली, मात्र त्यानंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. उच्च न्यायालयातही सुनावणी झाली. तेव्हाही सरकारने ठोस भूमिका मांडली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी थेट मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल करण्याची घोषणा केली. त्यामुळे मंत्री परब यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

(हेही वाचा लाचखोरीच्या ६ हजार तक्रारी, केवळ २१३ प्रकरणांवर चौकशी)

थेट आमच्याशी चर्चा करा! 

दरम्यान आता एसटीच्या कामगार संघटनांनी नवीन भूमिका घेतली आहे. जर राज्य सरकारला आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत चर्चेसाठी नको असतील, तर त्यांनी आता थेट आमच्याशी चर्चा करावी, मात्र चर्चा एसटीच्या विलीनीकरणावरच होईल, असे कामगार नेत्यांचे म्हणणे आहे.

मंत्रिमंडळात निर्णय होणार 

येत्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.