औरंगाबाद नव्हे संभाजीनगर! जिल्हा परिषदेत ठराव संमत

126

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून करण्यात येत आहे. नामांतर संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता, जो अद्यापही प्रलंबित आहे. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करणार असे आश्वासन सत्ताधारी शिवसेनेकडून देण्यात आले होते. यासाठी नामकरण हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. आता यात, भाजपनेही पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, असा ठराव मांडण्यात आला. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला.

भाजप-सेनेचे एकमत 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर वातुरे यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला. याला शिवसेनेच्या इतर नेत्यांनी पदाधिकारी सदस्यांनी अनुमोदन दिले. औरंगाबाद शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्याचा केंद्राकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव प्रलंबित आहे, असे शिवसेनेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी सभेत स्पष्ट केले. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी देखील त्यांनी केली. यानंतर, सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.

( हेही वाचा : मंत्री परबांच्या निवासस्थानी का वाढवला पोलिस बंदोबस्त? वाचा… )

संभाजीनगर करण्याची मागणी

औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला, यानंतर या शहराचे नाव औरंगाबाद करण्यात आले. १९८८ला औरंगाबादेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबादऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे अशी मागणी होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.