तरुणींना गोर्यागोमट्या, उजळ रंगाचं आश्वासन देण्याची जाहिरात हिमाचल प्रदेशमधील कंपनीला चांगलीच महागात पडली आहे. या कंपनीच्या राज्यातील दोन गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासनानं छापा टाकत सुमारे ४८ लाखांचा माल जप्त केला आहे. अनेक सौंदर्यप्रसाधन क्रिम्सच्या जाहिरातींना बळी पडणार्या असंख्य महिला वर्गाला वाचवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं (एफडीए) आता कडक मोहिम सुरु केली आहे.
…हा मजकूरही कायद्यान्वये आक्षेपार्ह
स्रियांच्या चेहर्याच्या रंगावरील न्यूनगंडाचा फायदा घेत गो-या रंगाची हमखास गॅरंटी देत आपलं फेअरनेस क्रीम विकणं हे एफडीच्या कायद्यात गुन्हा आहे. या कायद्याचा आधार घेत हिमाचल प्रदेश येथील उत्पादक कंपनी असलेल्या ‘मे. झी. लॅबोरेटरीस लिमिटेड’ या कंपनीच्या ‘मायफेअर क्रीम’च्या ४८ लाखांचा माल एफडीनं जप्त केला आहे. या क्रिमच्या लेबलवर ‘अविश्वसनीय सुंदरता’ असा उल्लेख एफडीए अधिका-यांच्या नजरेस आला. हा उल्लेख एफडीच्या कायद्यानुसार आक्षेपार्ह ठरतो तर उत्पादनाच्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजळतो’ हा मजकूरही कायद्यान्वये आक्षेपार्ह ठरतो.
(हेही वाचा – परमबीर सिंह, ३० दिवसांत हजर व्हा! न्यायालयाचा आदेश)
राज्यात दोन ठिकाणी छापे
- १८ नोव्हेंबर रोजी एफडीएचे औषध निरीक्षक अधिकारी प्रशांत आस्वार, रासकर यांनी कंपनीच्या भिवंडी येथील गोडाऊनमध्ये छापा टाकला. यात मायफेअर क्रिमचा १४ लाखांचा माल जप्त करण्यात आला.
- या छाप्यानंतर दुस-याच दिवशी १९ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी नागपूरातून ३४ लाखांचा माल जप्त केला. या प्रकरणात राज्यात अजून विविध ठिकाणी छापे पडण्याची शक्यता आहे.
त्वचेवरील रंग उजळतं अशी आश्वासन देणा-या जाहिराती अन्न व औषध प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांची औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ व नियम १९५५ या तरतुदींचं उल्लंघन करतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या जाहिराती करु नका, असं आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केलं आहे.