सध्या लग्न सराईचा काळ सुरू असून तुलसी विवाहानंतर सर्वच ठिकाणी सनई चौघडे वाजताना दिसताय. मात्र अशा आनंदाच्या वातावरणात एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. नांदेड येथील दिग्रस खुर्द येथे रविवारी एका लग्नातील जेवणाने साधारण दोनशे जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
कोणताही रुग्ण गंभीर नाही
रविवारी झालेल्या विवाहाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी गावातील लहान मुलांसह मोठ्यांना मळमळ, उलटी, चकर येणं, हातपाय दुखणे, जुलाब होणे असे प्रकार सुरू झाले. या प्रकारानंतर सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याची माहिती भोजुच्यावाडीचे सरपंच प्रतिनिधी सतीश देवकत्ते यांनी तात्काळ उपकेंद्राला दिली. यानंतर बाधा झालेल्या रुग्णांनी उपकेंद्र गाठले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. काही रुग्णांना कंधार येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून कोणताही रुग्ण गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – कंगनाने दुखावल्या शीख धर्मियांच्या भावना, मुंबईत गुन्हा दाखल)
वऱ्हाडाला अस्वस्थ वाटल्याने प्रकार उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस बुद्रुक येथील कल्याणकर कुटुंबात रविवारी हे लग्न कार्य होते. लग्न लागल्यानंतर लगेच जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. दुपारी चार वाजेपर्यंत जेवण सुरू होते. लग्नाचा दिवस चांगला पार पडला मात्र दुसऱ्या दिवशी दुपारपासून लग्नात जेवण केलेल्या वऱ्हाडाला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर एकच धावाधाव सुरू झाली. या घटनेनंतर पाहुण्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
Join Our WhatsApp Community