एसटीबाबत महत्वाच्या बैठकीआधी आझाद मैदानात रंगले नाराजी नाट्य 

114

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी बुधवारी राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चेला येण्याचे आवाहन केले. त्यानुसार सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे बैठकीला जायला निघाले असता आझाद मैदानातील एसटी कामगारांमध्ये पडळकर-खोत नाराज होऊन आंदोलन सोडून जात आहेत, असा गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी खोत-पडळकरांच्या मागे धावत त्यांना उचलून पुन्हा जागेवर आणून बसवले.

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे सरकारच्या बाजूने भूमिका घेत आहेत, असे संदेश मंगळवारी अचानकपणे एसटी कर्मचारांमध्ये फिरू लागले होते. त्यामुळे कामगारांमध्ये मतभेदाचे वातावरण निर्माण झाले. त्याचे पडसाद बुधवारी उमटले. पडळकर-खोत हे नाराज झाले आहेत, असा मतप्रवाह आझाद मैदानात कामगारांमध्ये पसरला. त्यामुळे सकाळी जेव्हा पडळकर आणि खोत हे बैठकीसाठी जायला निघाले तेव्हा मात्र कामगार अक्षरशः टाहो फोडत पडळकर आणि खोत यांच्या मागे धावत गेले आणि तुम्ही नाराज होऊ नका, आम्हाला सोडून जाऊ नका, असे सांगत त्यांनी दोघांना अक्षरश: पुन्हा आंदोलनस्थळी बसवले.

(हेही वाचा क्रिप्टो करन्सीवर बंदी आणण्यासाठी हालचाली! किंमती गडगडल्या)

आम्ही कामगारांसोबत! – सदाभाऊ खोत 

आम्ही कामगारांसोबत आहोत, कामगारांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. आता कामगारांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आला आहे. कामगारांच्या आंदोलनाच्या एकजुटीमुळे त्यांच्या पदरी योग्य ते पडणार आहे, यामुळे अनेकांची पोटदुखी सुरु झाली आहे. त्यामुळे आमच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहे. तरीही आम्ही कामगारांसोबतच आहोत. दरम्यान आपण कितीही आंदोलन केले तरी चर्चेशिवाय निर्णय होणार नाही. म्हणून सरकारसोबत चर्चा करावी लागणार आहे. त्यासाठी चर्चेला जावे लागणार आहे. त्याआधी आम्ही तज्ज्ञांसोबत चर्चा करू, असेही खोत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.