मुंबईतील भारतीय चलनी नोटांचा चक्क कारखाना सुरू होता. त्या कारखान्याचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतील पायधुनी परिसरात हा कारखाना सुरु होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने ही महत्वाची कारवाई केली आहे.
राहत्या घरात छापायचा नोटा
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने पायधुनी परिसरात सुरू असलेला भारतीय नोटा छापण्याचा कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी गुप्तवार्ता विभागाने शब्बीर हासम कुरेशी या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहेत. पायधुनीच्या करिमी मंजील, नारायण ध्रुत स्ट्रीट येथे आरोपी रहात असून राहत्या घरीच तो या नोटा छापत होता. मागील अनेक दिवसापासून तो या नोटा छापत असून मुंबईच्या विविध बाजार पेठेत त्याने त्या वितरित केल्या आहेत. या प्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून शब्बीरला अटक केली असून त्याचा साथीदार याचा शोध पोलिस घेत आहेत. शब्बीरवर यापूर्वीही एनडीपीएस अँक्ट अंतर्गत पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.
(हेही वाचा एसटीबाबत महत्वाच्या बैठकीआधी आझाद मैदानात रंगले नाराजी नाट्य)
पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात अवैध धंदे
याआधी एनसीबीने पायधुनी येथे अमली पदार्थांची निर्मिती होत असलेला कारखानाच उद्धवस्थ केला होता. मुंबई पोलिस मुख्यालयापासून दीड-दोन किमी परिसरात हा कारखाना अनेक दिवस बिनदिक्कत सुरु होता, आता भारतीय बनावट चलनी नोटांचा कारखाना याच पायधुनी परिसरातून उद्ध्वस्त करण्यात आल्याने पोलिस मुख्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Join Our WhatsApp Community