ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी ठाण मांडून आहेत. मंगळवारी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अनिल परब यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत अंतरिम पगारवाढ देण्यात येणार असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यानंतर आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत पगारवाढीवर सकारात्मक चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगारवाढ देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार मूळ वेतनाच्या 41 टक्के वाढ करण्यात आली आहे. ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अशी असणार पगारवाढ
यावेळी अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत होतील, अशी हमी दिली. या नव्या निर्णयानुसार अशी असणार पगारवाढ… घरभाडे भत्ता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच केली जावी, ही बाब देखील मान्य झाली आहे. या बाबी करारामध्ये होत्या. पण बेसिकचा विषय होता. जे कर्मचारी सेवेत 1 वर्ष ते 10 वर्ष या श्रेणीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 झालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली असून एसटीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक पगार वाढ असल्याचेही त्यांनी सांगितले.
10 ते 20 वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 4 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण पगार 23 हजार 040 होता तो आता 28 हजार 800 रुपये झाला आहे. 20 वर्षांहून अधिक श्रेणीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 2 हजार 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ वेतन 26 हजार आणि स्थूल वेतन 37 हजार 440 होतं, त्यांचं वेतन आता 41 हजार 040 झालं आहे. ज्याचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थूल वेतन 53 हजार 280 होतं, त्यांना 2500 रुपयांची वाढ केल्यामुळे मूळ वेतन 39 हजार 500 तर स्थूल वेतन 56 हजार 880 होईल.