गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानात दिवस-रात्र सुरू होते. एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. या संपाचा तिढा सुटावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी पगार वाढीची घोषणा केली. यासह संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना उद्यापर्यंतचा अल्टीमेटम देखील दिल्याचे सांगितले आहे. मात्र ४१ टक्के पगारवाढ केल्यानंतरही कर्मचारी संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. जोपर्यंत सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्राच राज्यातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तर सरकारने पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही जे कर्मचारी उद्या सकाळपर्यंत कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
(हेही वाचा – भाजपाची एसटी आंदोलनातून माघार, कामगार मात्र संपावर ठाम!)
…तर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार
मागील काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन हे राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत निर्णय घेतल्यानंतर संपेल, असे वाटत होते. मात्र एसटी आंदोलक संप मागे घ्यायला तयार नाहीत. आझाद मैदानावरील एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आलं आहे. आज आणि उद्या दोन दिवसांत कामावर रुजू व्हा, नाहीतर परवापासून निलंबीत कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे. जे कर्मचारी निलंबित झालेत ते कामावर रुजू झाल्यास निलंबन मागे मात्र, परवापासून कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
तुटेपर्यंत ताणू नये तर…
यासंदर्भात आपली भूमिका मांडताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. आम्ही आमचा निर्णय जाहीर केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय मान्य असेल ते कर्मचारी कामावर हजर होतील, ज्यांना हा निर्णय मान्य नसेल त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. कर्मचाऱ्यांनी कोणाची लिडरशीप स्वीकारावी हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त मी त्यांना एकच सांगू इच्छितो, तुटेपर्यंत ताणू नये. एकदा तुटलं तर जोडणार नाही. निलंबित झालेले कर्मचारी उद्या आले तर त्यांचे निलंबन मागे घेऊ, असेही त्यांनी सांगितले.