विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुंबई महापालिका सभा आणि विविध समित्यांच्या सभांमध्ये पदोन्नतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणारी अडचण आता दूर झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करताना पदोन्नती आणि नेमणूकांचे प्रस्ताव मंजूर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे महापालिका सभांसह विविध समित्यांच्या सभांमध्ये आता कंत्राट पदोन्नती आणि नेमणुकीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार आहे. मात्र, विकास कामांचे प्रस्तावच विचारात घेतले जाणार नाही.
‘या’ प्रस्तावांवरील निर्णयाचा मार्ग खुला
मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत दोन सदस्यांची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिका सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीसह विविध समित्यांच्या सभांमध्ये विकास कामांच्या प्रस्तावांसह पदोन्नतीचे व नेमणुकीचे प्रस्तावांना फटका बसला होता. आचारसंहितेमुळे हे प्रस्ताव मंजूर करता येत नव्हते. विधान परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आदर्श आचारसंहितेसंदर्भात निर्देश प्राप्त झाले आहेत. यामध्ये त्यांनी महापालिका आणि तिच्या संबंधित समित्यांच्या सभामध्ये विविध आस्थापनेवर नियमित नेमणूका करणे, पदोन्नत्या देणे, तदर्थ तत्वावर नेमणूक करणे तसेच पद व नेमणुका पुढे चालू ठेवण्याच्या प्रस्तावांचा विचार करण्यास परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाची याला हरकत नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे आगामी महापालिका सभा तसेच विविध समित्यांच्या पटलावरील पदोन्नती व नेमणुकांच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.
(हेही वाचा – ठरलं! विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार)
अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
महापालिकेची आगामी सभा येत्या सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी होत असून या सभेच्या पटलावर महापालिका चिटणीस पदाचा प्रस्ताव आहे. यासह विविध संवर्गातील अभियंत्यांच्या पदोन्नतीचे प्रस्तावही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. आचारसंहितेमुळे याबाबतचे प्रस्ताव मंजूर करता येत नव्हते. परंतु आता हे प्रस्ताव मंजूर करण्याचा मार्ग खुला झाल्याने एक प्रकारे अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या दोन जागांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी मतदान होत असून काँग्रेस पुरस्कृत सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. परंतु १० डिसेंबरपर्यंत याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community