नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरूच आहे. नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसात तीन खून झाल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची माहिती समोर येताच संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाल्याने शहर हादरले आहे. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
असा घडला प्रकार
सातपूर परिसरातील भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे हे शुक्रवारी सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीत गेले होते. गेल्या काही दिवसापासून या कंपनीत युनियन स्थापनेवरून दोन युनियनमध्ये वाद सुरू आहेत. इघे यांनी युनियन स्थापन करण्यास दुसऱ्या युनियनच्या प्रमुखासह काही कामगारांचा विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी इघे आज सकाळी कंपनीत गेले होते. यावेळी वाद होऊन त्यांच्यावर सशस्त्र वार करण्यात आले. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ईघे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, असल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याने पक्षाचे नेतृत्व करणे लोकशाहीच्या विरोधी)
हत्येचे सत्र सुरूच
अमोल इघे यांच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकच्या सातपूर पोलीस स्थानकात नाशिकच्या भाजप सोबतच नातेवाईक ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हसरूळला सराईत गुन्हेगाराची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. यासह दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोड वरील आरटीओ ऑफिसजवळ एका भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.