भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
(हेही वाचा – कोल्हापूर, धुळे-नंदुरबारसह मुंबईतल्या दोन जागांवर बिनविरोध निवडणूक होणार)
…पण त्यांचे भविष्य खरे ठरत नाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, भाजपाचे नेते मागील दोन वर्षापासून मविआ सरकार पडणार अशा भविष्यवाण्या नेहमीच करत असतात पण त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही. महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही.
‘मी पुन्हा येणार…’ म्हणणारे थकून गेले
‘मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार’ म्हणणारे थकून गेले असून आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली आहे. आता नवीन कुडमुडे ज्योतीषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत. त्याची ही भविष्यवाणीही खोटी ठरणार असून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल व महाराष्ट्राचा विकास करेल असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
Join Our WhatsApp Community