कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस पन्नास हजार रुपये इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
ही मदत थेट बँक खात्यात होणार जमा
कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर केंद्राकडून मंजूरी मिळत आदेश देखील देण्यात आले होते. त्यामुळे ही मदत आता थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – राणेंचे सत्ताबदलाचे भाकीत! शरद पवार तडकाफडकी दिल्लीत)
ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक
हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड -१९ मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोव्हिड १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.