परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी!

109

बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक असणारे परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. परळी वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे असणारे हे परळीतील वैद्यनाथ मंदिर या देवस्थानात सध्या खूप पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे 50 लाख द्या अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची, धमकी पत्राद्वारे या देवस्थानाला देण्यात आली आहे. दरम्यान,सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीकरांना घाबरु नका, असं आवाहन केलं आहे.

काय लिहिलयं पत्रात ?

मला पैशांची गरज आहे, वैद्यनाथ मंदिराकडे खूप पैसे आहेत त्यामुळे मला 50 लाख द्या, अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवू असं या पत्रात लिहिलं आहे. मुख्य म्हणजे या धमकी देणा-या पत्रात, धमकीदाराने स्वत:चे नाव, मोबाईल नंबर, पत्ता या सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यामु्ळे या देवस्थानाला आलेली धमकी धक्कादायक तर आहेच पण हास्यास्पदही आहे. या धमकीदाराचा सध्या पोलिस शोध घेत असून,पत्रात दिलेला मोबाईल नंबर बंद लागत आहे.

20 वर्षांपूर्वीही दिली होती धमकी 

श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी महाराष्ट्र, तसेच बीड पोलिस आणि दहशतवादी विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलिस खाते याबाबत त्वरित एॅक्शन घेत आहे. असं सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

परळीकरांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विटसुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दु:ख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करुन धमकी देणारे गजाआड दिसतील, असंही मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. दरम्यान,
धमकीचं पत्र कुणी पाठवलं याचा पोलीस शोध घेत आहेत. मंदिर परिसरातला पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. याआधी २० वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी परळी वैद्यनाथचं मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती.

 (हेही वाचा : राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.