सहायक आयुक्त पदावरून उपायुक्त पदी बढती मिळालेल्या ए विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्यावर अतिक्रमण विभागाचा भार सोपवण्यात आला आहे. तर परिमंडळ दोन वरून परिमंडळ १ मध्ये बदली करण्यात आलेल्या विजय बालमवार यांची पुन्हा एकदा बदली करत परिमंडळ चार मध्ये पाठवण्यात आले आहे.
अतिक्रमण निर्मुलन विभागाची जबाबदारी
उपायुक्त भरत मराठे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या उपायुक्त पदासाठी ए विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांना सेवा ज्येष्ठते नुसार उपायुक्त पदी बढती देण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावांना विधी समिती आणि महापालिकेच्या मान्यता देण्यात आली होती. परंतु उपायुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली नव्हती. २१ ऑक्टोबरला महापालिकेच्या मंजुरी नंतर तब्बल एक महिन्यांनी अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या उपायुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त पद रिक्त होते, याच अतिरिक्त कारभार उपायुक्त संजोग कंबरे यांच्याकडे होता. पण या विभागाला आता कायम उपायुक्तपदाचा अधिकारी देत या पदाची जबाबदारी चंदा जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
बालमवार यांची चार वर्षांत सहा वेळा बदली
यापूर्वी परिमंडळ सहाच्या उपायुक्त पदी असलेल्या विजय बालमवार यांची बदली कोविड कालावधीत परिमंडळ चार मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यातच त्यांची बदली परळ लालबाग, वडाळा अँटॉप हिल, वरळी, दादर माहीम ते धारावी आदी भागाच्या परिमंडळ २ च्या उपायुक्त पदी झाली. परंतु तिथून त्यांची बदली पुन्हा कुलाबा ते भायखळा या परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदी झाली. परंतु तिथे त्यांचे मन रमत नाही तोच अंधेरी पश्चिम ते गोरेगाव मालाड आदी परिमंडळ चारच्या उपायुक्त पदी करण्यात आली आहे. बालमवार यांच्यासारख्या हुशार अधिकाऱ्याचा मागील तीन ते चार वर्षांतच पाच ते सहा वेळा बदली झाली आहे. परिमंडळ एक मध्ये दोनवेळा उपायुक्त पदाची जबाबदारी भुषवणाऱ्या बालमवार हे दुसऱ्यांदा परिमंडळ ४ च्या उपायुक्त पदाची धुरा सांभाळायला निघाले आहेत. यापूर्वी त्यांनी अतिक्रमण निर्मुलन, घनकचरा व्यवस्थापन, कर निर्धारण व निवडणूक आदी विभागाच्या उपायुक्त पदाची धुरा सांभाळली आहे.
Join Our WhatsApp Community