‘आठवणीतील बाबासाहेब पुरंदरे!’ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वाहिली श्रद्धांजली

121

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबर 2021 रोजी देहावसान झाले. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्यातर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शोकसभा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शुक्रवारी 26 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाहक राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाहक स्वप्निल सावरकर उपस्थित होते. तसेच, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष सुनिल पवार आणि इतिहास संकलक आप्पा परब उपस्थित होते.

या शोकसभेच्या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट प्रेजेंटेशनच्या माध्यमातून दाखवण्यात आला. त्यानंतर 2 मिनिटे उभे राहून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू यावेळी उलगडून सांगण्यात आले.

(हेही वाचा शिवशाहिरांचे निर्वाण)

आता मावळ्यांची जबाबदारी आहे!

भारतात केवळ महाराष्ट्र राज्याला इतिहास आहे, इतर राज्यांना भूगोल आहे. शिवशाहीरांनी आपल्याला शिवगर्जना शिकवली, त्यामुळे त्यांचा आदर्श ठेवत, आपण मैदाने शिवगर्जनेने गर्जत ठेवली पाहिजे, असे इतिहास संकलक आप्पा परब म्हणाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मावळे तयार केले, आता या मावळ्यांची जबाबदारी आहे. त्यांनी बाबासाहेबांचा वारसा पुढे चालवायला हवा, असे समितीचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी उपस्थितांना आवाहन केले.

1 5

सत्य इतिहास लिहा!

सूर्याचे वर्णन करण्याची गरज नसते, असे सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर हे बाबासाहेबांनी केलेल्या शिवकालीन इतिहास संशोधनाच्या कार्याबाबत बोलतांना केले. झोपलेल्या महाराष्ट्राला जागवण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेबांनी केले. इतिहास कसा लिहावा यावर वीर सावरकर यांनी एक लेख लिहिला, त्या लेखात सावरकर म्हणतात की, इतिहास हा सोप्या पद्धतीने लिहिला गेला पाहिजे, त्याला क्लिष्ट करुन लिहिण्याची गरज नाही. तारखा, ठिकाणे, नामावली, सनावळ्या यात इतिहासाला गुंतवून टाकू नका, इतिहास चांगल्या शब्दांत लोकांपर्यत पोहोचवा. इतिहास लिहिताना तो सत्य लिहा. जर सत्य इतिहास लिहिला गेला, तर आपल्या पूर्वजांच्या चुकांपासूनही आपण शिकू शकतो. इतिहास सांगताना तो रोचक पद्धतीने सांगितला गेला पाहिजे. कारण, इतिहास सांगून आपण एक पिढी घडवत असतो. आणि सावरकरांना अपेक्षित असा इतिहास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिला, असे रणजीत सावरकर यावेळी म्हणाले.

Ranjit

आपल्या कामातून इतरांनाही प्रोत्साहित करा!

बाबासाहेबांनी प्रोत्साहित करणारा इतिहास लिहिला आणि तो कथनही केला. त्यामुळे महाराष्ट्रात जागृती निर्माण केली. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची खरी पोचपावती तेव्हा ठरेल, जेव्हा त्यांचे व्रत आपण प्रत्येक जण स्वीकारु, त्यामुळे प्रत्येकाला जे शक्य होईल ते त्याने करायला हवे आणि आपल्या कामातून इतरांनाही प्रोत्साहित करायला हवे, तर ती बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही रणजीत सावरकर यावेळी म्हणाले.

…आणि घरी जाऊन भेटण्याचा योग आला!

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी या कार्यक्रमाद्वारे बाबासाहेबांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, विक्रम संपत यांनी सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाचे भाषांतर मी आणि रणजीत सावरकर यांनी केले. त्या पुस्तकाचे मराठीतील नाव ‘वीर सावरकर विस्मृतीचे पडसाद ‘असे आहे. या पुस्तकाची एक आवृत्ती देण्यासाठी मला बाबासाहेबांना त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचा योग आला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या अनेक आठवणी सांगितल्या.

Manjiri

 ( हेही वाचा: अलर्ट! राज्यातील ‘या’ ११ जिल्ह्यांत कोविडची चिंता वाढली! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.