दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत परतलेल्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. या रुग्णाला कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही, त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले आहेत.
तातडीने कोविड सेंटरमध्ये दाखल
२४ नोव्हेंबरला हा तरुण केपटाऊनहून डोंबिवलीला आला होता, असे केडीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने त्याची तातडीने दखल घेतली आहे. या तरुणाला कल्याणमधील आर्ट गॅलरी या कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिकची माहिती देताना, केडीएमसीच्या साथरोग विभागाच्या अधिकारी प्रतिभा पानपाटील म्हणाल्या, की हा तरुण दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर कोणाच्याही संपर्कात आला नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेपूर्वी तो दिल्लीत आला होता.
(हेही वाचा: आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी लावण्याची गरज! राजेश टोपेंचे मत )
बाधित व्यक्ती दिल्लीहून मुंबईत आली
पानपाटील यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेतून दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला होता. त्याच्या भावाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कुटुंबातील उर्वरित सदस्यांची सोमवारी चाचणी केली जाणार आहे. रुग्णाला सध्या केडीएमसीच्या आर्ट गॅलरी आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. केडीएमसीचा आरोग्य विभाग सतर्क आहे. आम्ही या नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सुसज्ज असल्याचे पानपाटील यावेळी म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community