परमबीर सिंग यांच्यावरील जामीनपात्र वॉरंट रद्द! वाझे – सिंग आमनेसामने

127

न्या. चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरोधात जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे. तत्पूर्वी, सोमवारी परमबीर सिंग न्या. चांदीवाल आयोगाचे कार्यालय असलेल्या इमारतीत पोहोचले. आयोगाच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी ते महासंचालक होमगार्डच्या कार्यालयात गेले. न्या. चांदीवाल आयोगाकडून सिंग यांना १०० कोटी कथित वसुली प्रकरणी चौकशीसाठी कार्यालयात बोलावण्यात आले होते. न्या. चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांना दंडही ठोठावला आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत १५ हजार रुपये जमा करावा, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

काय म्हणाले वाझे-सिंग?

या दरम्यान अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात तुरुंगात असलेल्या माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याची देखील आयोगाकडून उलटतपासणी सुरू असून सोमवारी सचिन वाझे आणि परमबीर सिंग हे न्या. चांदीवाल आयोगासमोर समोरासमोर आले. या दरम्यान वाझे आणि सिंग यांच्यात बातचीत देखील झाली आहे. मात्र दोघांमध्ये काय बोलणे झाले याबाबत कळू शकले नाही. वाझे आणि सिंग हे अँटिलिया स्फोटके प्रकरणानंतर प्रथमच आमनेसामने आले होते.

(हेही वाचा कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावरही विरोधकांचा गोंधळ)

सिंग यांना १५ हजार रुपयांचा दंड

विशेष म्हणजे परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला होता. याआधीही आयोगाने त्यांना हजर राहण्यास सांगितले होते, मात्र ते हजर राहू शकले नाहीत. हजर न राहिल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला. दरम्यान आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जमीनपात्र वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट रद्द करण्यासाठी परमबीर सिंग सोमवारी आयोगासमोर हजर झाले होते. न्या. चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांचा जामीनपत्र वॉरंट रद्द करून त्यांना दंडही ठोठावला आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत १५ हजार रुपये जमा करावा, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

सिंग कार्यालयात गेले पण खुर्चीत बसले नाही

परमबीर सिंग सध्या महासंचालक होमगार्ड पदावर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंग त्यांच्या केबिनमध्ये गेले मात्र खुर्चीवर बसले नाहीत, तर इतर अधिकाऱ्यांसमोर बसलेल्या खुर्चीवर बसले. परमबीर सिंग हे रजेवर असून त्यांनी सध्या पदभार सांभाळला नसल्यामुळे ते होमगार्ड महासंचालकाच्या खुर्चीवर न बसता इतर अधिकाऱ्यासाठी असणाऱ्या खुर्चीवर बसले होते. या पदाचा कार्यभार सध्या आयपीएस संदीप बिश्नोई यांच्याकडे आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. ही बाब समोर येताच मुंबईतील राजकारण तापले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. अँटिलिया बॉम्ब प्रकरण उघडकीस आल्यानंतर परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. खंडणीच्या एका प्रकरणात त्यांना मुंबईतील न्यायालयाने फरार घोषित केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.