दोन वर्षांनंतर पेडणेकरांना महापौर निधीची झाली आठवण

110

मुंबई महापौरपदी विराजमान होऊन किशोरी पेडणेकर यांचा दोन वर्षांचा कालावधी लोटला. परंतु मागील दोन वर्षांमध्ये गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी असलेल्या महापौर निधीमध्ये कोणत्याही प्रकारे वाढ होण्यासाठी प्रयत्न केला नाही. मात्र, आता या पदाचा कालावधी संपुष्टात येत असल्याने अखेर त्यांना महापौर निधीची आठवण झाली आणि या निधीत वाढ करण्यासाठी त्यांनी सर्वच नगरसेवकांच्या खिशात हात घातला आहे. प्रत्येक नगरसेवकाचे एक महिन्याचे मानधनच महापौर निधीला देण्याचे निर्देश त्यांनी सर्व नगरसेवकांना दिले आहेत.

गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मदत

अतिशय दुर्धर आजाराच्या गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी महापौर निधीतून आर्थिक मदत केली जाते. या महापौर निधीतून दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये तीन वर्षांपूर्वी सुधारीत निर्णय घेत १५ ते २० हजार रुपयांची आर्थिक मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून महापौर निधीतून गरीब व गरजू रुग्णांना दुर्धर आजारासाठी एवढी रक्कम दिली जाते. परंतु यापूर्वीचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कालावधीत आर्थिक मदतीची रक्कम तर वाढवली, परंतु या महापौर निधीमध्ये त्याप्रमाणे वाढ केली नाही. परिणामी महापौर निधीतील रक्कम कमी होत चालली आहे.

(हेही वाचा महापौरांमुळे गरीब रुग्ण औषधांपासून वंचित! वर्षभर लटकली औषध खरेदी)

नगरसेवकांच्या खिशात घातला हात

या महापौर निधीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्याच्यादृष्टीकोनातून महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेमध्ये प्रत्येक नगरसेवकाचे एक महिन्याचे मानधन महापौर निधीत जमा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे नगरसेवकाचे आगामी महिन्याचे एक महिन्याचे मानधन महापौर निधीत जमा होणार आहे. मागील दोन वर्षांत या महापौर निधीमध्ये निधी वाढवण्याच्यादृष्टीकोनातून कोणताही प्रयत्न महापौरांकडून झालेला नाही. त्यामुळे अखेर महापौरपदावरुन बाजुला होण्यापूर्वी महापौर निधीत नगरसेवकांच्या खिशातच हात घालून वाढ करण्याचा प्रयत्न होत आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.