ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका निर्माण झालेला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रभाव पाहता सरकारने खबरदारी घेत ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, चैत्यभूमी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. नव्या विषाणूसाठी खबरदारी म्हणून या सूचना जारी केल्या असून, याचे अनुपालन करावे, असे आवाहन परिपत्राद्वारे राज्य शासनाने केले आहे.
मार्गदर्शक सूचना
- ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-१९ विषयक आरोग्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण खबरदारी घेत साध्या पद्धतीने, जास्त लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावा.
- हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. तसेच दादर, चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी घरी राहूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे.
- शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहतील. जे चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. शरीराचे तापमान सर्वसाधारण आहे अशा, लोकांना कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येईल. सोशल डिस्टन्सींगचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल.
- सदर परिसरात कोणतेही स्टॉल लावू नयेत. तसेच सभा, मोर्चे काढू नयेत. राज्यातील प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्यामुळे कोविड विषयक नियम पाळून आदेश काढावेत.
- स्थानिक प्रशासन, पोलिस, महापालिका यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे.
( हेही वाचा : कागद नाही म्हणून अडीच महिने गुणपत्रिकांपासून विद्यार्थी वंचित! )