पुलाचे काम स्थगित तरी ३ महिने बॅरिकेड्सने रस्ता बंद! भाजपाचे आंदोलन

117

मालाड पूर्व येथील जनतेच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे काम स्थानिकांच्या विरोधानंतर स्थगित करण्यात आले आहे, असे सांगून आज ३ महिने झाल्यानंतरही या पुलाच्या कामाकरिता उभारलेले बॅरिकेड्स हटवण्यास महापालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. इतकेच नाही तर स्थानिकांना त्रास देण्याचे काम महानगरपालिकेने चालविले होते. सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसच्या या फसव्या व जनविरोधी कारभाराच्या विरोधात भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने आज, मंगळवारी आंदोलन करत रद्द झालेल्या मालाड पूर्व पादचारी पुलाचे बॅरिकेड्स हटविले.

स्थानिक रहिवाशांचा विरोध बघता पूल रद्द

मालाड पूर्वेकडील दफ्तरी रोड आकाराने लहान असल्यामुळे आप्पापाडा, कुरार गाव, तानाजी नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करण्यासाठी व मालाड येथे दैनंदिन कामकाजासाठी पायी येण्याकरिता जिकरीचे झाले होते. त्यामुळे भातखळरांनी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करून पादचारी पूल मंजूर करून आणला. परंतु स्थानिक रहिवासी व व्यापारी यांचा विरोध लक्षात घेत हा पादचारी पूल रद्द करण्याचे ठरविण्यात आले. विकासात राजकारण करण्यात तरबेज असलेल्या पालकमंत्री आदित्य ठाकरे, ज्यांचा मालाड पूर्वशी काहीही संबंध नाही, असे मंत्री असलम शेख यांनी हा पादचारी पूल रद्द करण्यात आल्याचे घोषित केले.

(हेही वाचा – महापालिकेचा मोठा निर्णय! उद्यापासून नव्हे तर १५ डिसेंबरपासून शाळा होणार सुरु)

बॅरिकेड्समुळे वाहतूक कोंडीची समस्या

यानंतर कंत्राटदाराशी झालेल्या ‘अर्थपूर्ण संवादामुळे‘ कोणतेही कायदेशीर किंवा कार्यालयीन आदेश दिले नाही. अगोदरच आकाराने लहान असलेल्या दफ्तरी रोडवर उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे तासंतास वाहतूक कोंडी होत आहे.  धक्कादायक बाब म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतांवर डोळा ठेऊन मागील पाच वर्षांत पहिल्यादांच मालाडला आलेल्या महापौरांनी महानगरपालिकेचे काम असताना व या पुलाच्या कामाशी काहीही संबंध नसलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना बोलवून जनतेच्या भावनांचा विचार करून निर्णय घेण्याचे वक्तव्य केले.

‘…हा एककलमी कारभार सत्ताधाऱ्यांकडून होतोय’

दरम्यान, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता जनतेला खोटे बोलायचे आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या जनतेला सूडबुद्धीने त्रास द्यायचा हा एककलमी कारभार शिवसेना-कॉंग्रेसकडून केला जात आहे. पुढील आठ दिवसांत या रस्त्यावरील बॅरिकेड्स महानगरपालिकेने हटविले नाही तर जनतेच्या सोयीकरिता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्वतः सर्व बॅरिकेड्स हटवतील, असा इशारा सुध्दा अतुल भातखळकर यांनी यावेळी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.