देशात कोरोना व्हायरसचा धोका कमी झाला असल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू होती. मात्र दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट या सगळ्याला पुन्हा ब्रेक लावतोय की काय अशी स्थिती सध्या झालेली दिसतेय. जगभरात ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातले असताना सर्वच देशात चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 देशात ओमिक्रॉनचा संसर्ग पसरला असून त्या देशातून साधारण 400 हून अधिक प्रवासी देशात आले असल्याने भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत एका संस्थेने ओमिक्रॉन आणि कोरोना लसीकरणासंदर्भात मोठा दावा केला आहे.
(हेही वाचा – ओमिक्रॉन असूनही, भारतात तिसरी लाट येणार नाही! डॉ. रवी गोडसे म्हणतात…)
गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटचा दावा
एका इन्स्टिट्यूटने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनवर स्पुटनिक ही कोरोनाची लस प्रभावी आहे. गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने हा दावा केला असून दावा करणारी संस्था रशियातील 100 वर्ष जुनी संशोधन करणारी संस्था आहे. तसेच, ओमिक्रॉन विरूद्ध लढा देण्यासाठी स्पुटनिक व्ही आणि स्पुटनिक लाईट या दोन्ही कोरोना लसी सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर स्पुटनिक व्ही लस घेणाऱ्या लोकांना ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव दिसत नाही. असा दावा देखील गमालेया या रिसर्च संस्थेने केला आहे.
हे नवीन म्युटेशन अधिक धोकादायक
रविवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला डॉ. गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचे 30 पेक्षा जास्त वेळा म्युटेशन झाल्याचे समोर आले आहे. असेही सांगितले जात आहे की, हे म्युटेशन किंवा बदल कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये हा बदल झाला आहे. हे नवीन म्युटेशन अधिक धोकादायक आहे. त्यामुळे कोरोना लसही त्यावर किती प्रभावी ठरणार याबाबत शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटसाठी देशातही प्रशासन सतर्क आहे.