नायर रूग्णालयातील ‘त्या’ हलगर्जीपणाची होणार चौकशी!

113

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात मंगळवारी सकाळी गंभीररित्या भाजलेल्या पुरुषाला आणि वर्षभराच्या बालकाला तासभर उपचाराविना तडफडत राहण्याची वेळ आली. रुग्णालयातील अपघात विभागात उपस्थित डॉक्टर आणि परिचारिका त्यांच्यावर उपचार देण्याऐवजी तसेच खुर्चीवर बसून राहिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धास्तावलेल्या नायर रुग्णालयाने या दोघांवरही चौकशीचे आदेश दिले आहेत.

रुग्णांच्या उपचारात दिरंगाई

वरळीतील आगीतील दुर्घटनेत गंभीररित्या भाजलेल्या दोन रुग्णांना सकाळी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी बालकाचा पृष्ठभाग आणि पायाची चामडी निघाली तर,संबंधित पुरुष चेहऱ्यापासून, हातापायाची त्वचा निघाल्याने आक्रोश करत होता. लहान मुलाचेही हुंदके आवरत नव्हते. गंभीररित्या भाजूनही पुरुषाला जमिनीवर चादर घालून बसवण्यात आले. जखमांमुळे त्याला जमिनीवर बसताही येत नसल्याने अक्षरशः उभे राहून तो तडफडत होता. तरीही अतिदक्षता विभागात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्याला तपासले नाही. हा प्रकार तासभर सुरु राहिल्यानंतर अखेर एकाने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला. यात डॉक्टर आणि परिचारिका दोघंही मान खाली घालून खुर्चीवरच बसून राहिल्याचे दिसून येते आहे. या घटनेची बोंबाबोंब झाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. मात्र या रुग्णांचा तपशील विचारताच रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिका प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रमेश भारमल यांनी रुग्णांची नावे माहित नसल्याचे सांगितले. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉक्टर भारमल यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : ‘६ डिसेंबर’ महापरिनिर्वाण दिनासाठी काय आहेत मार्गदर्शक सूचना? )

अतिदक्षता विभागातील प्रकार

रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. दोन्ही रुग्ण गंभीररित्या भाजलेले असताना उपस्थित डॉक्टरने तातडीने उपचार सुरु करायला हवे होते. मात्र तसे घडले नसल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली असून, डॉक्टर आणि परिचारिकेवर चौकशी सुरु केली आहे. संपूर्ण चौकशीनंतर त्यांच्यावरील कारवाईची भूमिका स्पष्ट केली जाईल. असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांनी स्पष्ट केले.

चौकशी होणार 

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश निर्गमित केले आहेत. नायर रुग्णालयाचे उप अधिष्ठाता सदर दिरंगाई प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशी अंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार व कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.