कमला नेहरु उद्यानातील ‘ट्री वॉकला’ कोस्टलच्या भुयारी मार्गाचा अडथळा!

213

मलबार हिलमधील कमला नेहरु पार्कच्या सौंदर्यात आणखी एक भर पडणार आहे. याठिकाणी पशु-पक्ष्यांचे मुक्त विहार न्याहाळता यावे तसेच पक्ष्यांचे आवाज ऐकता यावे यासाठी कमला नेहरु पार्कमध्ये निसर्ग उन्नत मार्ग अर्थात, ट्री वॉकचे बांधकाम करण्यात येणार आहे. याच्या बांधकामाचा सुमारे १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असला तरी, कोस्टल रोडचे दोन भुयारी मार्ग याठिकाणांहून जात असल्याने या ट्री वॉकच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण झाले आहे. त्यामुळे आयआयटीच्या हिरव्या दिव्यानंतरच या ट्री वॉकचे स्वप्न साकार होणार आहे.

ट्री वॉक बांधण्याचा निर्णय

मुंबईतील मलबार टेकडी येथील कमला नेहरु उद्यान, फिरोजशहा उद्यान ही प्रेक्षणीय ठिकाणे असून, या ठिकाणी देश-विदेशांतून पर्यटक येत असतात. कमला नेहरू उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलाचे तसेच त्यामध्ये विहार करणा-या पशु-पक्षी व वन्यजीवांच्या दर्शनासाठी, त्यांच्या ध्वनींचा आनंद घेण्यासाठी, कोणत्याही प्रकारची वृक्षहानी अथवा वन्यजीवांची हानी होऊ न देता या भूभागातून फेरफटका मारण्यासाठी, या उद्यानात निसर्ग उन्नत मार्ग अर्थात, ट्री वॉक बांधण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

( हेही वाचा : पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी सव्वा कोटींची सफाई )

सल्लागारांची नियुक्ती

हे काम तांत्रिक तसेच भौगोलिक दृष्टया अत्यंत किचकट व कठीण आहे. तसेच उच्च दर्जाच्या मुंबई शहरामध्ये एक वेगळया शैलीचे प्रेक्षणीय स्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाने या कामाकरीता आय. एम. के. आर्किटेक्टस् व मे. स्ट्रक्ट्वेल डिझाइनर्स ऍन्ड कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित वास्तु शास्त्रविशारद तसेच संरचनात्मक सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आय. एम. के. आर्किटेक्टस यांनी संकल्प चित्रे व मे. स्ट्रक्ट्वेल डिझाइनर्स ऍन्ड कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड यांनी आराखडा तसेच अंदाजपत्रके तयार केली आहेत.

स्ट्रक्ट्वेल डिझाइनर्स ऍन्ड कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड यांनी निसर्ग उन्नत मार्ग कामासाठी १२ कोटी ६६ लाख रुपयांच्या रकमेचे अंदाजपत्रक सादर केले आहे. परंतु या मार्गाखालून सागरी किनारी रस्ते प्रकल्पाअंतर्गत दोन भुयारी बोगदे जात असल्यामुळे या कामाकरिता आय. एम. के. आर्किटेक्टस् यांनी तयार केलेली संकल्प चित्रे व स्ट्रक्ट्वेल डिझाइनर्स ऍन्ड कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड यांनी तयार केलेला आराखडा तसेच अंदाजपत्रके यांची पुनर्तपासणी मुंबईतील प्रसिध्द आयआयटी संस्थेकडून करून घेण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.