दक्षिण आफिक्रेच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वे, बेस्ट बस, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, मेट्रो, मोनो रेलसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसमध्ये कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच मास्कसह प्रवेश देण्यात येणार आहे. या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच रिक्षा-टॅक्सी प्रवासासाठीदेखील कोरोना लसीकरणाचा नियम लागू करण्यात येणार आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांनाच रिक्षा-टॅक्सीमध्ये आता एन्ट्री असणार आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना सूचना दिल्या असून या नियमाची येत्या दोन दिवसात अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’असेल तरच प्रवास
राज्य सरकारकडून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीस परवानगी देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ किंवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र असेल तरच प्रवास करता येणार आहे, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना ‘बेस्ट’ प्रशासनाने सर्व आगारप्रमुख आणि व्यवस्थापकांना दिली. त्यानंतर आता यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना देखील सूचना दिल्या आहेत.
(हेही वाचा – लवकरच मुंबई-नाशिक ‘मेमू’ लोकलने प्रवास करता येणार!)
‘आरटीओ’च्या भरारी पथकांमार्फत होणार कारवाई
त्यामुळे आता या नियमाची अंमलबजावणी रिक्षा, टॅक्सीमध्येही होणार आहे. राज्यातील सर्व ‘आरटीओ’ ना या नव्या नियमावलीची माहिती देतानाच त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. ही कारवाई ‘आरटीओ’च्या भरारी पथकांमार्फत टॅक्सी, रिक्षाची तपासणी करून करण्यात येईल, असे देखील सांगितले जात आहे. प्रवासी असलेल्या रिक्षा, टॅक्सींची अचानक तपासणी करताना प्रवाशाकडे ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ किंवा लसीकरण प्रमाणपत्र नसेल तर त्यावर या पथकाकडून कारवाई होईल.