महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसली, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
काय म्हणाले पडळकर
स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच केल्या. फक्त तोंडाची वाफ केली. विधान सभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. यासह पुढे ते असेही म्हणाले, चार महिने उलटून गेले तरी अजून लोकसेवा आयोगावर सदस्यांच्या नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. 2019 साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अजूनही नियुक्तीसाठी झुरावे लागतंय, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
#MPSC च्या प्रश्नांबाबत घोषणा करणाऱ्या #अजित_पवारांनी दिशाभूल केली. लोकसेवा आयोगावर सदस्यांच्या नियुक्तीबाबत सरकार उदासीन आहे,उमेदवारांना आडमुठ्या धोरणांमुळं अजूनही नियुक्ती नाही.वयोमर्यादेबाबतही कुठलीच अंमलबजावणी नाही.सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रती नियत साफ नाही.जाहीर निषेध. pic.twitter.com/hRelUPGCOJ
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 1, 2021
(हेही वाचा – ओमिक्रॉनचा धोका! जाणून घ्या हवाई प्रवासाबाबतची नवी नियमावली)
पडळकरांकडून जाहीर धिक्कार
कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचं वय वाढले, त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली, प्रत्यक्षात मात्र कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापितांनी फक्त पाने पुसली असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रती नियत साफ नाही. त्यांच्या हेतूवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करतायेत. अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.