कोरोनाच्या दुस-या लाटेच्या तडाख्यातून वाचल्यानंतर राज्यात मोठ्या संख्येने आरटीपीसीआर चाचणीवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलंय. मात्र या तपासणीत कोरोना लक्षणे नसलेलीच माणसं मोठ्या संख्येनं येत असल्याचे निरीक्षण खासगी रुग्णालयातील मायक्रोबायॉलोजिस्टची टीम नोंदवतेय. ८० टक्के माणसं आरटीपीसीआर तपासणीत कोरोनाबाधित नसल्याचं दिसतंय. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना शोधायला घरोघरी जाऊन आरटीपीसीआर तपासणी आणि लसीकरण केले जावे, अशी मागणी जोर धरु लागलीय.
प्रवासाच्या परवानगीसाठीच चाचण्या
आपल्याला कोरोना झालाय का, याबाबत चाचणी करण्यासाठी मुळात आरटीपीसीआर चाचण्या होत नाहीत, प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्यानं माणसं चाचण्यांसाठी येत असल्याची माहिती विविध खासगी रुग्णालयातील मायक्रोबायोलोजिस्ट देत आहेत. तपासणीवेळीही केवळ प्रवासानिमित्ताने तपासण्या करायला आलोत, अशी कबुलीही मिळत असल्याची माहिती मायक्रोबायोलोजिस्टनी दिली. हा प्रकार प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यांपासून दिसतोय.
खासगी रुग्णालयांतील बहुतांश आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये लक्षणे नसलेली माणसेच दिसत आहेत. प्रवासासाठी आरटीपीसीआर बंधनकारक असल्याने हा प्रकार दिसून येत आहे. आता ओमायक्रोनच्या भीतीमुळे आरटीपीसीआर चाचण्याचा आधार ठरत असल्याने हा ट्रेण्ड अजून वाढणार.
– डॉ. अभय चौधरी, विभागप्रमुख, मायक्रोबायोलोजी विभाग,डी.व्हाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, नेरुळ
(हेही वाचा उच्च शिक्षित तरीही १ हजार कामगारांच्या हाती झाडूच!)
लक्षणे नसतानाही कोरोना चाचणी
गेल्या तीन महिन्यांत राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी झाली. दररोज हजारापेक्षाही कमी रुग्णांची नोंद होत असल्याचं आरोग्य विभागाकडून पुरवल्या जाणा-या प्रसिद्धीपत्रकातून दिसून येतंय. प्रामुख्याने लसीकरण आता दहा कोटींच्याही पलीकडे गेलंय. त्यामुळे लोकसंख्येचा मोठा टप्पा लसीकरण मोहिमेतून पार पडला आहे. रुग्ण संख्या घटण्यासाठी मोठ्या संख्येने लसीकरण झाले आहे, त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. लक्षणे नसतानाही कोरोना चाचणी केल्याने तपासणी अहवाल नकारात्मक दिला जात असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.
कोरोना रुग्ण शोधण्यासाठी पालिकेने घरोघरी जाऊन तपासण्या करायला हव्यात. लसीकरण मोहिमही घरोघरी जाऊन द्यायला हवी.
– डॉ. पार्थिव सांघवी, माजी सचिव, भारतीय वैद्यकीय संघटना (आय़एमए)