अवकाळी पावसाचा पश्चिम महाराष्ट्रात कहर! रब्बी पिकांसह फळबागा उध्वस्त

133

राज्यात सध्या संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्यात बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांना उद्धवस्त केले. बुधवारी मध्यरात्रीपासूनच सातारा जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने द्राक्षांच्या बांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायच अडचणीत आला असून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने बळीराजाच्या पदरी सातत्याने निराशाच पडत आहे.

नुकसानभरपाईची मागणी

अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातील वाई तालुका, जावली तालुका महाबळेश्वर ,पाचगणी, सातारा तालुका आणि कोरेगाव तालुक्यात जास्त नुकसान झाले आहे. उत्पन्न वाढीच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्ची करुन शेतकरी शेती करतात, मात्र आता काढणीच्या दरम्यानच पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी उध्वस्त झाला. त्यामुळे पिक पाहणी आणि पंचनामे करुन नुकसानभरपाईची मागणी बागायतदार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

(हेही वाचा –मुख्यमंत्र्यांना 22 दिवसांनी डिस्चार्ज, आदित्य ठाकरेंसोबत ‘वर्षा’वर दाखल)

द्राक्षबागांना सर्वाधिक फटका

द्राक्षबागांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पंढरपूरसह नाशिकमध्ये द्राक्ष काढणीला सुरूवात होणार होती. मात्र त्यापूर्वीच वातारणातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे द्राक्षांवर फळकूज, मणीगळ, डाऊनी व भुरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आता याचे व्यवस्थापन केले तरी झालेले नुकसान भरुन निघणार नाही, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

संततधार, थंडीची हुडहुडीमुळे शेळया-मेंढ्यांचा मृत्यू

जुन्नर आंबेगाव तालुक्यात कालपासून संततधार पाऊस आणि थंडीची हुडहुडी सर्वाधिक वाढली आहे. त्यामुळे आंबेगाव जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये 378 पेक्षा अधिक पाळीव शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील 9 गावांमध्ये 188 तर जुन्नर तालुक्यातील 5 गावांमध्ये 70 आणि खेडमध्ये 45, शिरुरमध्ये 75 पेक्षा शेळ्यामेंढ्यांचा मृत्यू झाल्याने शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाची संततधार आणि थंडीची हुडहुडी यामुळे शेळया मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकिय विभागाकडून तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.